corona virus -प्रशासनाचे आवाहन बासनात,भाजी-धान्य खरेदीसाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:07 PM2020-03-23T18:07:10+5:302020-03-23T18:08:19+5:30
जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना दुकानांबाहेरच रांगेत थांबवून साहित्य देण्याचा पर्याय काढला.
कोल्हापूर : जमावबंदीचा आदेश, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अन्नधान्याचा साठा करण्याची गरज नाही, पॅनिक होऊ नका.. या सगळ्या आवाहनाला बासनात बांधून ठेवत सोमवारी कोल्हापूरकरांनी भाजी मंडई आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना दुकानांबाहेरच रांगेत थांबवून साहित्य देण्याचा पर्याय काढला.
महाराष्ट्रात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रविवारी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एखाद्या ठिकाणी थांबू नये, अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, पुढील काही दिवसांत सर्वच दुकाने बंद होतील, या भीतीमुळे नागरिकांनी अन्नधान्याचा साठा करायला सुरुवात केली आहे. रविवारी सर्वत्र बंद होता सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मीपुरी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होती.
सोमवारी दुपारी बाराच्यादरम्यान बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक दुकानदार दुकानांचे शटर अर्धे खुले ठेवून ग्राहकांना साहित्यांची विक्री करत होते. काही दुकानदारांनी दुकानांमध्ये यायला ग्राहकांना बंदी केली होती. त्याऐवजी दुकानाबाहेर ग्राहकांच्या नावे बिल करून त्यांना बाहेर थांबायला लावले होते. नाव पुकारतील त्याप्रमाणे ग्राहकांच्या हाती साहित्य सोपवले जात होते. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ दिसत होती शिवाय वाहनांमुळेहीवाहतुकीची कोंडी झाली होती.
याच दरम्यान महापालिकेची गाडी परिसरातून फिरत होती. ‘वाहने रस्त्याकडेला घ्या, दुकानांसमोर गर्दी करू नका, आरोग्याची काळजी घ्या’ असे आवाहन केले जात होते. व्यावसायिकहीदेखील गर्दी करू नका, आपल्या काळजीसाठीच हे सगळं सुरू आहे, असे सांगत होते. मात्र, बाजारपेठेतून ग्राहकांची गर्दी काही हटत नव्हती. अशीच गर्दी भाजी मंडईमध्ये देखील होती. भाजी विक्रेते. दुकानदार आणि ग्राहकदेखील तोंडाला मास्क बांधून दैनंदिन व्यवहार करत होते.