corona virus :लॉकडाऊनच्या धसक्याने अवघे शहर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 09:47 PM2020-07-19T21:47:21+5:302020-07-19T21:50:16+5:30
सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याने जणू अवघे शहर रविवारी किराणा वस्तू व धान्य, भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर अवतरले होते. त्यामुळे पाहाल तिकडे लोकांची तोबा गर्दी झाली होती. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, शिंगोशी,राजारामपुरी, आदी ठिकाणी किराणा,धान्य दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
कोल्हापूर : सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याने जणू अवघे शहर रविवारी किराणा वस्तू व धान्य, भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर अवतरले होते. त्यामुळे पाहाल तिकडे लोकांची तोबा गर्दी झाली होती. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, शिंगोशी,राजारामपुरी, आदी ठिकाणी किराणा,धान्य दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात पुन्हा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी १५ ते २० दिवस पुरतील इतक्या वस्तूंची खरेदी करून ठेवली. या खरेदीच्या बिगरहंगामी उत्सवामुळे जणू रस्त्यांवर गर्दीचा महापूर आल्यासारखी परिस्थिती रविवारी शहरवासीयांनी अनुभवली.
या काळात दुकाने व भाजी मंडई आणि किराणा दुकाने बंद राहणार असल्याने रविवारी दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यात आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासून शहरातील भाजी मंडईत ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र होते. मोकळ्या जागेत भाजीविक्रीमुळे वाहतुकीच्या कोंडीचे चित्र शहरातील प्रमुख चौकांत होते. शिवाजी रोड, मिरजकर तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा चौक, माळकर तिकटी, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, हत्तीमहाल रोड, लक्ष्मी रोड, बिंदू चौक, संभाजीनगर, नंगीवली चौक, शाहू बँक चौक, सावित्रीबाई फुले रुग्णालय चौक, उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, राजारामपुरी मुख्य रस्ता, बागल चौक हे रस्ते एखाद्या सणाच्या खरेदीवेळी ज्याप्रमाणे गर्दी होते, त्याप्रमाणे फुलले होते. प्रत्येक दुचाकीवर स्वारासह मागे एक व्यक्ती पोते, पिशव्या धरून बसल्याचे चित्र दिवसभर होते. खरेदीच्या नावाखाली गर्दीचा हा महापूर रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट न ठरोत
लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, महाद्वार रोड, गंगावेश, शिंगोशी मार्केट, रेल्वे फाटक, जुना बाजार (हत्तीमहाल रोड), महापालिका परिसर, आदी ठिकाणी खरेदीसाठी रांगा आणि कोणतेही सामाजिक अंतर न राखता ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. लॉकडाऊन आज, सोमवारपासून असे तरी रविवारच्या गर्दीमुळे अनेकांना कोरोनाची लागण न झाली म्हणजे मिळवले, अशी भयावह परिस्थिती या परिसरात होती.
दळपासाठी गर्दी
सात दिवसांच्या काळात घरामध्ये चपाती, भाकरी, बेसन, भाजणी या पिठांची कमतरता भासू नये याकरिता अनेकांनी दळप-कांडप गिरण्यांमध्ये रविवारी पहाटेपासून आपली दळप, कांडपे क्रमांकाला लावून ठेवली होती. एरवी या गिरण्यांमध्ये दोन-चार डब असतात. मात्र, रविवारी या गिरण्या अक्षरश: फुलून गेल्या होत्या.