corona virus - रिक्षांवर लावलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:43 PM2020-03-24T13:43:55+5:302020-03-24T14:04:36+5:30
कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूंशी लढायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने आधी या विषाणूची माहिती करून घेतली पाहिजे म्हणून महापालिका प्रशासनाने जनजागृतीवर विशेष जोर दिला आहे. त्याकरिता प्रत्येक विभागीय कार्यालयास तीन याप्रमाणे बारा रिक्षा व त्यावर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे कोरानाबाबत शहरात जनजागृती करण्यात येत आहे.
कोल्हापूर : कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूंशी लढायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने आधी या विषाणूची माहिती करून घेतली पाहिजे म्हणून महापालिका प्रशासनाने जनजागृतीवर विशेष जोर दिला आहे. त्याकरिता प्रत्येक विभागीय कार्यालयास तीन याप्रमाणे बारा रिक्षा व त्यावर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे कोरानाबाबत शहरात जनजागृती करण्यात येत आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून हजारो लोकांचा बळी गेला आहे. या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकास्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत रिक्षांद्वारे जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. आरोग्य विभागाच्यावतीने रविवारपासून शहरात चार ट्रॅक्टरद्वारे मध्यवर्ती बसस्थानक , रेल्वेस्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
शहरातील लक्ष्मीपुरी परिसर, संभाजीनगर वारे वसाहत परिसर, फुलेवाडी फायर स्टेशन, तुळजाभवानी परिसर या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागात जे नागरिक बाहेरगावाहून आले आहेत तसेच त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या घरातील कचरा इतर कचऱ्यांत मिक्स न करता स्वतंत्र गोळा करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
यासाठी प्रत्येक आरोग्य निरीक्षकांना प्रत्येकी एक किलो बायोमेडिकल वेस्टच्या पिशव्या स्वतंत्र कचरा गोळा करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.
सर्व प्रभागांतील सफाई कर्मचाऱ्यांना दोन हजार मास्क व हॅन्डग्लोज उपलब्ध करून दिले असून ते नियमितपणे घालण्याच्या सक्त सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले उपस्थित होते.