corona virus -बजापराव माने तालीमकडून ३ हजार मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 06:04 PM2020-03-24T18:04:27+5:302020-03-24T18:05:38+5:30
मंगळवार पेठ येथील बजापराव माने तालीम मंडळाच्यावतीने मंगळवारी बालकल्याण संकुल, अंधशाळेसह परिसरातील ३ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील बजापराव माने तालीम मंडळाच्यावतीने मंगळवारी बालकल्याण संकुल, अंधशाळेसह परिसरातील ३ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काही सामाजिक संघटना काम करीत आहेत. आता तालीम, संस्थांनीही यामध्ये पुढाकार घेतला आहे.
याचाच एक भाग म्हणून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठेतील बजापराव माने तालीमच्यावतीने तीन हजार मास्कचे वाटप केले. यामध्ये ३०० मास्क बाल संकुलात, तर १०० मास्क अंधशाळेत देण्यात आले. उर्वरित २७०० मास्क परिसरातील नागरिकांना घरात जाऊन देण्यात आले.
जनजागृतीसाठी माहितीपत्रक
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरा, वारंवार साबण लावून हात धुणे, हस्तांदोलन करू नका, संसर्ग टाळा, असे आवाहन करणारे माहितीपत्रक प्रत्येक घरांत मास्कसोबतच देण्यात आले.