corona virus : साडेचार लाखांचे बिल तक्रारीनंतर दीड लाखावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:32 PM2020-09-15T14:32:06+5:302020-09-15T14:34:47+5:30
प्रशासनाने कितीही बंधने घातली तरीही कोल्हापूरमधील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून प्रचंड पैसे उकळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : प्रशासनाने कितीही बंधने घातली तरीही कोल्हापूरमधील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून प्रचंड पैसे उकळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंत्र्यांचे इशारे, अधिकाऱ्यांच्या नोटिसांना कचऱ्याची टोपली दाखवत या रुग्णालयांनी येणाऱ्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता धुलाईचा धंदा सुरूच ठेवल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राजारामपुरीतील नामांकित रुग्णालयाने एका कोरोना रुग्णाचे एकूण बिल चार लाख ४७ हजार केले. आठ दिवस या रुग्णावर उपचार सुरू होते. या दरम्यान नातेवाइकांनी आठ दिवसांमध्ये एक लाख ७५ हजार रुपये उपचाराकरिता ॲडव्हान्स भरले होते; तर ४० हजार रुपये औषधांसाठी भरले होते. १३ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्याआधी रुग्णालयाने उर्वरित दोन लाख ३२ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र इतकी रक्कम या रुग्णाच्या नातेवाईकांना भरणे शक्य नव्हते.
अखेर या नातेवाइकांनी संयुक्त राजारामपुरीच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती दिली. एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचेही त्यांना सांगितले. पदाधिकारी दुर्गेश लिंग्रस, अनुप पाटील, कमलाकर जगदाळे, विनायक सूर्यवंशी, अमर निंबाळकर, संजय काटकर, धैर्यशील निंबाळकर, अविनाश माळी, मदन जाधव यांनी शासनाचे ऑडिटर येऊन त्यांनी बिल तपासल्याशिवाय हे प्रकरण न संपवण्याचा निर्धार केला.
प्रशासनातील लेखापरीक्षक रोकडे यांनी चार लाख ४७ हजारांची ही रक्कम एक लाख ६० हजारांवर आणली. त्यामुळे नातेवाइकांकडून जादा घेतलेले ५५ हजार रुपयेही रुग्णालयाला परत करावे लागले.
यांच्यावर कारवाई होणार का ?
बिलांची तपासणी झाल्याशिवाय रुग्णांच्या नातेवाइकांनी बिले अदा करू नयेत, असे आवाहन प्रशासन करीत आहे. मात्र रुग्णालयात पाय टाकताना लाख, दोन लाख भरल्याशिवाय आत घेत नाहीत, याचा जाब प्रशासन विचारणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.
केवळ इशारे देऊन भागणार नाही. ज्या रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत आता लूट केली आहे आणि ज्यांची बिले नंतर कमी झाली आहेत, त्यांच्यावर कोरोनाचे संकट संपल्यानंतर तरी कारवाई होणार नसेल तर मंत्री आणि प्रशासन यांचे इशारे केवळ हवेतील बुडबुडे राहणार आहेत.