corona virus - ‘चायनीज पार्सल’ने पोस्टमन धोक्यात: बंदी असूनही एक दिवसाआड आवक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:24 PM2020-03-24T14:24:12+5:302020-03-24T14:46:36+5:30
संपूर्ण जगाला ‘कोरोना’ देणाऱ्या चीनमधून एक दिवसाआड एक ‘चायनीज पार्सल’ पोस्टाच्या माध्यमातून कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे हे पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ते जीव मुठीत घेऊनच हे काम करत आहेत. त्यावर बंदी घातली असतानाही ती येतातच कशी? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोस्ट विभागाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने पोस्टमन यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शनिवार (दि.२१)पर्यंत जवळपास ५० ‘चायनीज पार्सल’ आली आहेत.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : संपूर्ण जगाला ‘कोरोना’ देणाऱ्या चीनमधून एक दिवसाआड एक ‘चायनीज पार्सल’ पोस्टाच्या माध्यमातून कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे हे पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ते जीव मुठीत घेऊनच हे काम करत आहेत. त्यावर बंदी घातली असतानाही ती येतातच कशी? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोस्ट विभागाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने पोस्टमन यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शनिवार (दि.२१)पर्यंत जवळपास ५० ‘चायनीज पार्सल’ आली आहेत.
कोरोना रोगाने जगभर हाहाकार माजविला आहे. हजारो लोकांचे बळी या संसर्गजन्य रोगाने घेतले आहेत. संपूर्ण जग यामुळे भीतीच्या छायेखाली आहे. केंद्र व राज्य सरकार या रोगाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करत आहे. एकाबाजूला या रोगाविरोधात दोन हात करण्यात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून प्रशासकीय अधिकारी गुंतले आहेत.
गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत सूक्ष्म नियोजन केले जात आहे; परंतु सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ज्या देशाने संपूर्ण जगाला हा ‘कोरोना’ दिला, त्या चीनमधील वस्तूंचे पार्सल बिनदिक्कत देशात दाखल होत आहेत. दिल्ली, मुंबईमार्गे पोस्टाच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून शनिवारी (दि.२१)पर्यंत ५० पार्सल कोल्हापुरात आली आहेत. त्यातील बहुतांश पार्सलचे वितरण पोस्टमन यांनी संबंधितांच्या पत्त्यावर जाऊन केले आहे.
हे करताना कोणतीही खबरदारी पोस्ट विभागाने घेतलेली दिसत नाही. इतका भयंकर रोग ज्या देशातून आला, तेथील वस्तू थेट कोल्हापुरात येत आहे. हे समजत असूनही पोस्ट प्रशासन त्याकडे कानाडोळा करून पोस्टमन व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहे, ही बाब गंभीर आहे.
सर्वाधिक पार्सल शहरातील
शहरात रमणमळा, शिवाजी पेठ, शनिवार पेठ, रेल्वे स्टेशन आदी कार्यालयांमध्ये चायनीज वस्तूंची पार्सल येत आहेत. नोकरीनिमित्त चीनमध्ये असलेल्या व्यक्तींकडून आपल्या कुटुंबियांना काहीतरी वस्तू या पार्सलमधून पाठविल्या जात असल्याचे चित्र आहे. या पार्सलचे सर्वाधिक प्रमाण हे शहरातील असल्याचे सांगण्यात आले.
सॅनिटायझर लावा आणि वाटा
चायनीज पार्सल हे दिल्ली, मुंबई येथून कोल्हापुरात येत आहे. त्याचा स्पर्श अनेकजणांना झालेला असतो. त्याबाबत कोणतीही खबरदारी पोस्ट विभागाकडून घेतली जात नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यावर ही पार्सल पूर्वीची असतील त्यामुळे सॅनिटायझर लावून त्याचे वाटप करा, अशी बालिश उत्तरे त्यांच्याकडून दिली जात आहेत. एकंदरीत या पार्सलच्या माध्यमातून एकप्रकारे बॉम्बच येत असूनही पोस्ट प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे यावरून दिसत आहे.
सध्या सर्व पार्सल वाटप बंद करण्यात आली आहेत.
शहरात चार ठिकाणी व तालुक्याच्या काही ठिकाणी पत्र वाटप सुरू आहे.
-ईश्वर पाटील,
प्रवर अधीक्षक कोल्हापूर पोस्ट आॅफिस