corona virus : जिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:31 PM2020-07-24T16:31:00+5:302020-07-24T16:38:18+5:30
गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेतून याबाबत यंत्रणा कार्यरत असून सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आता येथील कर्मचाऱ्यांवरही मोठा ताण आला आहे. सामान्य प्रशासन विभाग अतिशय महत्त्वाचे काम जिल्हा परिषदेतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने करीत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या खूपच कमी होती. त्यावेळी १२ तालुक्यांचा विचार करता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या शोधमोहिमेचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविले. मित्तल यांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गती असलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
यानंतर सुरुवातीला आडसूळ यांनी आपल्याच विभागातील चार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले; परंतु सुरुवातीला कमी असणारी रुग्णसंख्या मधल्या टप्प्यात झपाट्याने वाढू लागली. पुन्हा नंतर ती रोडावली आणि १० जुलैनंतर तर शेकडोंनी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले. त्यामुळे साहजिकच या विभागावरील ताण वाढायला सुरुवात झाली आहे.
सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आयजीएम - इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय अशा सहा शासकीय प्रयोगशाळांसह खासगी प्रयोगशाळांमधून पॉझिटिव्ह अहवाल हे आडसूळ यांच्याकडे येतात. त्यानंतर आलेल्या नावांच्या पत्त्यांबाबत खात्री केली जाते.
त्यानंतर कोल्हापूर महापालिका, सर्व नगरपालिका आणि त्या-त्या तालुक्यांना पॉझिटिव्ह रुग्णांची नावे आणि पत्ते कळवले जातात. यासाठीचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. त्या त्या तालुक्यानुसार आणि नगरपालिकांनुसार याद्या टाकल्यानंतर मग पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.
तोपर्यंत जिल्हा परिषदेतील या संपर्कशोध मोहीम विभागाच्या वतीने त्यांच्या संपर्कात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांतील नातेवाईक, ग्रामस्थ, नागरिक यांच्याही याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. यासाठी सुरुवातीला चार कर्मचारी होते. त्यानंतर पुन्हा सहाजणांची नियुक्ती करण्यात आली आणि आता एकूण ४६ जणांना या कामासाठी आदेश देण्यात आले असून, त्यांना गुरुवारपासून या कामासाठी तैनात करण्यात आले आहे.
रात्री १२ पर्यंत काम
रात्री १२ पर्यंत प्रयोगशाळेतून जे अहवाल येतात, त्यांची छाननी करून रुग्णांची नावे आणि संपर्कातील नावे त्या-त्या तालुक्यांना पाठवण्याचे काम केले जाते. त्यामुळे यांतील काही निवडक कर्मचाऱ्यांना रात्री १२ पर्यंत झोपता येत नाही. आता अहवाल अगदीच रात्री १२ नंतर येणार असेल तर मात्र ती प्रक्रिया सकाळी लवकर केली जाते.
दोन कर्मचाऱ्यांच्या घरी संगणक
यातील मुख्य प्रक्रिया पार पाडणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने संगणक त्यांच्या घरी दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी तसेच जिल्हा परिषदेतील कामाची वेळ संपल्यानंतर ही संपर्कशोध मोहीम सुरू ठेवण्याकरिता या दोघांना घरातून काम करण्यासाठी संगणक दिले आहेत.
जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार सुरुवातीपासूनच या कामी आम्ही नियोजन केले. जिल्हा परिषदेच्या ५० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे संपर्कशोध मोहिमेचे महत्त्वपूर्ण काम कोल्हापूर जिल्हा परिषद करीत आहे.
- रविकांत आडसूळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग
हाय रिस्क आणि लो रिस्क संपर्क आकडे (२२ जुलैपर्यंत)
तालुका पॉझिटिव्ह रुग्ण इतक्या जणांशी संपर्क
- आजरा १०५ १२३७
- भुदरगड १११ १२७६
- चंदगड ३०६ २२६१
- गडहिंग्लज १८२ ४१६०
- गगनबावडा ००७ ०७६
- हातकणंगले ८११ ६९०९
- कागल ०८१ ६१५
- करवीर ३४१ ३९९३
- कोल्हापूर मनपा ५०३ ५८८५
- इतर ०४४ ४९४
- पन्हाळा १२१ ९७४
- राधानगरी १०६ १११०
- शाहूवाडी २३१ २०६७
- शिरोळ १३३ ११३७
- एकूण ३०८२ ३२१५४