corona virus : कारागृहाच्या भिंतीही कोरोनाने भेदल्या, कोल्हापुरातील ७५ बंदींना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:20 PM2020-09-04T15:20:02+5:302020-09-04T15:22:44+5:30
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.
राज्यातील कारागृहांप्रमाणेच कळंबा कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कारागृह अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली होती; पण अखेर कोरोनापुढे कारागृहाच्या अभेद्य भिंतीही कमकुवत ठरल्या. कारागृहात बंदीजनांची संख्या जास्त असल्याने त्याद्वारे संसर्ग होऊ नये यासाठी सुमारे ४५० बंदीजनांची रजा व पॅरेलवर मुक्तता केली होती; पण १५ दिवसांपूर्वी दोन वयोवृद्ध बंदी आजारी पडल्याने त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली; त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले.
पण त्यानंतर टप्प्याटप्प्याने बंदीजनांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५, ३७, ३३ अशी तीन टप्प्यांत एकूण ७५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बंदीजनांना स्वतंत्र क्वारंटाईन यार्ड तयार करून त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे.
पाच महिला व दोन कर्मचारी
कारागृहात ४० महिला बंदी आहेत, त्यांपैकी सहा महिलांचे अहवाल पॉझिटव्ह आले. कारागृहात काम करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय अस्ताव्यस्त असणाऱ्या दोन बंदीजनांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
परतलेल्या बंदीजनांनी आणला कोरोना
पॅरोल रजा व सुट्ट्या संपल्याने पुन्हा परतलेले काही बंदीजन कारागृहात येताना त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत; पण काही दिवसांनी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यामुळे या बाहेरून आलेल्या बंदींमुळेच कोरोनाने कारागृहात प्रवेश केल्याचे मानले जाते.