corona virus - कागलमध्ये कोरोना संशयित ही माहितीच खोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:51 PM2020-03-24T14:51:55+5:302020-03-24T14:57:38+5:30
कागलमध्ये कोरोना संशयित रुग्ण सापडल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ व पोस्ट खोटी असल्याचे सोमवारी चौकशीनंतर स्पष्ट झाले. ज्या रुग्णाबाबत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून आपल्याला कोरोनाचा रुग्ण ठरवून व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल संबंधित व्यक्तीनेच कागल पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला याचा शोध पोलीस सायबर सेलच्या मदतीने घेत आहेत.
कागल : कागलमध्ये कोरोना संशयित रुग्ण सापडल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ व पोस्ट खोटी असल्याचे सोमवारी चौकशीनंतर स्पष्ट झाले. ज्या रुग्णाबाबत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून आपल्याला कोरोनाचा रुग्ण ठरवून व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल संबंधित व्यक्तीनेच कागल पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला याचा शोध पोलीस सायबर सेलच्या मदतीने घेत आहेत.
घडले ते असे : गेली दोन दिवस कागल शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांना चांगलीच धडकी भरली. तो खरा आहे का म्हणून अनेकांनी ‘लोकमत’कडे विचारणा केली. येथील ग्रामीण रुग्णालयातून परप्रांतीय मजुराला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पाठविताना देण्यात आलेल्या संदर्भ चिठ्ठीचा उपयोग करून ही अफवा पसरविण्यात आली.
व्हिडिओतील तरुण एका रोटो स्पिनमध्ये काम करणारा व मूळचा राजस्थानचा आहे. तो तिकडून आल्याने शनिवारी ग्रामीण रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली. त्यास किरकोळ ताप व सर्दी होती.
कामगार असलेल्या व्यक्तीची खबरदारी म्हणून पुढील तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले; परंतू त्याच्या प्रिस्क्रीप्शनवर ‘संशयित कोवीड-१९’ अशी नोंद होती; परंतु कुणीतरी त्यातील ‘संशयित’ हा शब्द खोडून त्याच्याखाली लाल रेषा काढून हे प्रिस्क्रीप्शन व्हायरल केले. त्यामुळे कागलसह जिल्ह्यातही भीतीचे वातावरण पसरले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे करत आहे.
कोरोनाबाबत समाजमनात प्रचंड भीती आहे. त्यामुळे कागलचा हा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर कुणी व्हायरल केला याचा शोध आम्ही घेत आहे. लोकांनी सोशल मीडियावरील कोणत्याच माहितीची खातरजमा केल्याशिवाय लोकांनी विश्वास ठेवू नये किंबहुना या काळात सोशल मीडियावर संदेश पाहणेच बंद करावे.
- शिल्पा ठोकडे
तहसीलदार, कागल