corona virus : काेरोनाचा धडाका सुरुच ;चोवीस तासात नवीन २१७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:46 PM2020-07-24T18:46:48+5:302020-07-24T19:06:47+5:30
कोल्हापूर व इचलकरंजी या दोन प्रमुख शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धडाका सुरुच असून शुक्रवारी सकाळपर्यंत नवीन २१७ रुग्ण आढळून आले.
कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी या दोन प्रमुख शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धडाका सुरुच असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत नवीन ६६ कोरोना रुग्ण आढळले असून जिल्ह्यात एकूण २१७ रुग्ण आढळले आहेत.
यातील कोल्हापूर शहरात ११ रुग्ण आहेत. शास्त्रीनगरमध्य ४, एका खासगी रुग्णालयात १, शहरात २, राजोपाध्यनगर येथे १, रंकाळा येथे १, मुक्त सैनिक वसाहतीत १, आणि मार्केट यार्ड य इथे १ रुग्ण आढळला आहे.
करवीर तालुक्यात ११ पैकी प्रयाग चिखली येथे ३, निगवे दुमाला येथे १, केर्लीत १, नंदवाळ येथे १, वाकरे येथे ३, निगवे खालसा येथे १, हातकणंगले तालुक्यात ६ पैकी भेंडवडे येथे १, कारंडे मळा येथे १, शिरोली पुलाची येथे २, नदीवेश नाका (इचलकरंजी)-येथे १, इचलकरंजी शहरात १ असे रुग्ण आढळले आहेत. शिरोळ तालुक्यात ९ पैकी शिरोळ येथे १, गौरवाड येथे १, शिरदवाड येथे १, यड्राव येथे १, कवठेसार येथे २, कुरूंदवाड येथे १, शिरढोण येथे १, कोथळी येथे १ रुग्ण आढळला. भुदरगड तालुक्यात गारगोटी येथे १ रुग्ण आढळला.
पन्हाळा तालुक्यात १६ पैकी पोर्ले येथे १, पडळ येथे १, वाघबीळ येथे १, कोतोली येथे १०, हळदी येथे १, यवलूज येथे १, मानेवाडी येथे १ रुग्ण आढळला. गडहिंग्लज तालुक्यात ११ पैकी हडलगे येथे १, महागाव येथे १, गडहिंग्लज येथे २, शेंड्री येथे १, तर हलकर्णी येथे ६ रुग्ण आढळले. चंदगड तालुक्यात जथ्थेवाडी येथे १ रुग्ण तर राधानगरी तालुक्यात राही येथे १ रुग्ण आढळला.
सतत वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा व आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली असून रुग्णांवरील उपचाराकरिता आणखी बेडची संख्या कशी वाढवता येऊ शकेल, यावर जिल्ह्यातील सर्व अधिकारी विचार करत आहेत.
सातत्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा असली तरी अद्याप काही सुधारणा झालेली नाही. नागरीकांनी मात्र स्वत:ला कोंडून घेतले असल्याने नजिकच्या काही दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसतील असा आशावाद व्यक्त होताना दिसत आहे.
जिल्ह्यात तासागणिक रुग्ण संख्या वाढताना पहायला मिळत असून त्यामुळे सर्वत्र एक प्रकारची अस्वस्थता पहायला मिळते. एकूण ९६ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २१६१ इतकी आहे.
गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता आलेल्या अहवालात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सीपीआर रुग्णालयाने म्हटले आहे. त्यामध्ये रत्नागिरीच्या ६३ वर्षाच्या पुरुष, विक्रमनगरातील ७० वर्षाचा पुरुष, साठ वर्षाची इचलकरंजीतील महिला, शिरोळ तालुक्यातील ४८ वर्षाचा व ७० वर्षाचा पुरुष तर कसबा बावडा येथील ६१ वर्षाचा पुरुष यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
कोरोना चाचणीचे दिवसभरात सात अहवाल बाहेर पडले. त्यातून कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असल्याचे दिसून आले.
पन्हाळ्यातील कोतोलीत १२, करवीर तालुक्यातील खुपीरे, वाकरे गावातून १२ तर शिये गावात १० रुग्ण, पाचगांवात चार आढळून आले. मलकापुरात पाच, हातकणंगले शहरात नऊ रुग्ण आढळले. कोल्हापूर शहरात सर्वाधिक ९५ तर इचलकरंजीत २३ रुग्ण बाधित असल्याचे समोर आले.
यंत्रणेवर ताण , रुग्णांकडे दुर्लक्ष
कोल्हापूर शहरात रुग्णसंख्या वाढेल तसा महानगरपालिका आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. गुरुवारी दुपारी एका रुग्णाच्या नातेवाईकाने माहिती देताना सांगितले की, चार व्यक्ती एका रुग्णालयाशी संबंधित असून त्यांचे अहवाल गुरुवारी सकाळी पॉझिटीव्ह आले. परंतु प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना क्वारंटाईन केलेल्या हॉटेलमधून रुग्णलयात न्यायला महापालिकेचे कोणीही कर्मचारी सायंकाळपर्यंत पोहचले नव्हते.
लक्षणे सौम्य असल्याने तेथेच राहा असे त्यांना सांगण्यात आले. दुसरी एक घटना अशी की, शिवाजी विद्यापीठातील डीओटी कोरोना काळजी केंद्रात गेल्या तीन दिवसापासून कोणीही डॉक्टर फिरकलेले नाहीत. कोरोनाची बाधा झाली असतानाही त्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांसह त्यांचे नातेवाईक सुध्दा धास्तावले आहेत.
कुटुंब संसर्ग सुरु
एका कुटुंबातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली की, पाठोपाठ त्यांच्या घरातील अन्य सदस्यांनाही लागण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. आतापर्यंत एकाच घरातील दोन दोन, चार चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा कुटुंब संसर्ग सुरु आहे. वास्तविक घरातील एका जरी व्यक्तीला काही लक्षणे आढळून येताच त्यांना स्वत:ला इतरांपासून दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.
परंतु दुखणं अंगावर काढणे किंवा मला काही झालं नाही असा मनाचा ग्रह करुन घेतल्यामुळेही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी खऱ्या अर्थाने तोडायची असेल तर ती घरापासूनच सुरुवात करायला पाहिजे.
आज सकाळी १० वाजेपर्यंत आज सकाळी 10 वाजेपर्यंत ४०६ प्राप्त अहवालापैकी २९२ निगेटिव्ह तर ८३ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यातील 12 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह तर १९ अहवाल नाकारण्यात आले आहे. प्रतिजन चाचणीचे १० प्राप्त अहवालापैकी ७ निगेटिव्ह आहेत, तर ३ पॉझीटिव्ह असे एकूण ८६ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
तालुका निहाय आकडेवारी -
आजरा - १०४, भुदरगड - ९४, चंदगड- ३२८, गडहिंग्लज - १८५ , गगनबावडा -७ , हातकणंगले - २१४, कागल -७५, करवीर -३८२, पन्हाळा- १४४, राधानगरी - १०९, शाहूवाडी - २३७, शिरोळ - ९२, नगरपालिका हद्द - ७५१, महानगरापालिका - ६१७, इतर - ५४ . एकूण - ३३३९ रुग्ण
उपचार घेऊन घरी गेलेले रुग्ण - ११३६ , उपचार घेत असलेले रुग्ण - २१६१. एकूण मृत्यू - ९६