corona virus : कणेरकर नगरातील व्यक्तीस कोरोना; परिसर प्रतिबंधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:29 PM2020-06-23T16:29:11+5:302020-06-23T16:31:40+5:30
न्यू कणेरकर नगरातील एक ६२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे सोमवारी (दि. २२) मध्यरात्री स्पष्ट झाल्याने महानगरपालिका यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित व्यक्ती राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तो चारी बाजूंनी सील करण्यात आला. त्या व्यक्तीच्या पत्नी व दोन मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्राव घेण्यात आले आहेत.
कोल्हापूर : न्यू कणेरकर नगरातील एक ६२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे सोमवारी (दि. २२) मध्यरात्री स्पष्ट झाल्याने महानगरपालिका यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित व्यक्ती राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, तो चारी बाजूंनी सील करण्यात आला. त्या व्यक्तीच्या पत्नी व दोन मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्राव घेण्यात आले आहेत.
शहरात यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित व्यक्ती या बाहेरगावांहून संसर्ग होऊन आलेल्या होत्या; तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाग्रस्त झाल्या होत्या. परंतु न्यू कणेरकर नगरातील ही व्यक्ती स्थानिक असून आजारी असल्याने त्यांना कोरोना झाल्याबद्दल आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून एका आजारावर उपचार करण्याकरिता या व्यक्तीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले होते. सोमवारी रात्री १२ वाजता त्याचा अहवाल सीपीआर रुग्णालयाच्या हाती आला आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तत्काळ महानगरपालिका यंत्रणेला त्याची खबर देण्यात आली.
पालिकेचे गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रमेश मस्कर, नगरसेविका वनिता देठे यांचे पुत्र अभिजित देठे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ न्यू कणेरकर नगरात धाव घेऊन कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील त्यांच्या पत्नी, दोन मुले यांना रुग्णालयात दाखल केले. तसेच घराभोवतीचा शंभर मीटर परिसर बॅरिकेट्स लावून सील केला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक केला.
नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांनी कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची यादी बनविण्याचे काम सुरू केले. मंगळवारी सकाळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली, तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.