corona virus -‘होम कोरोंटाईन’चे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:46 PM2020-03-21T16:46:46+5:302020-03-21T16:52:56+5:30
कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्याकरिता होम कोरोंटाईन सांगितले आहे. परंतु याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक कोरोंटाईन सेंटर (अलगीकरण केंद्रा)मध्ये ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिले.
कोल्हापूर : कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्याकरिता होम कोरोंटाईन सांगितले आहे. परंतु याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक कोरोंटाईन सेंटर (अलगीकरण केंद्रा)मध्ये ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी दिले.
मागील काही दिवसांत आपण परदेश प्रवास करून आला आहात किंवा परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहात. आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये किंवा आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना किंवा परिसरातील नागरिकांना संसर्ग होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात यावी. त्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपणास निर्देश देण्यात येत आहेत.
यामध्ये आपले कुटुंबीय व इतरांपासून नेमून दिलेल्या कालावधीत अलगीकरण करावे व कोणाचाही संपर्क न येता, स्वतंत्र रहावे. आपण ज्या ठिकाणी राहात आहात किंवा आपणास ठेवण्यात येत आहे, त्या ठिकाणी बाहेरील कोणतीही व्यक्ती आपल्या थेट संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपण वर नमूद केल्याप्रमाणे कालावधीसाठी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे निर्देश या आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.
या आदेशात नमूद अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अशा व्यक्तिंना शासनाकडून सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात येईल. आपण स्वत: सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.