corona virus : रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी जिल्हा परिषदेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:39 PM2020-08-26T17:39:39+5:302020-08-26T17:40:59+5:30
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन्स घेण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी वाढली आहे. आतापर्यंत २६४१ इंजेक्शनचे वाटप झाले आहे. बुधवारी रांगा लावून हे इंजेक्शन घेतले.
कोल्हापूर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन्स घेण्यासाठी जिल्हा परिषदेत गर्दी वाढली आहे. आतापर्यंत २६४१ इंजेक्शनचे वाटप झाले आहे. बुधवारी रांगा लावून हे इंजेक्शन घेतले.
कोरोनाचे अति गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यापूर्वी रेमडेसिविर इंजेक्शन्स दिले जातात. एका रुग्णाला सहा इंजेक्शन लागतात. जिल्हा परिषदेकडून हे इंजेक्शन मोफत वाटप केले जात आहेत. बाजारात याची किंमत साडेचार हजार रुपये इतकी आहे. सध्या बाजारात या औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण असल्याचे सर्व पुरावे दिल्यानंतर हे औषध दिले जात आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद औषध भांडार येथून हे इंजेक्शन दिले जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि तो ही गंभीर असल्याचे संबंधित डाक्टरचे पत्र, पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे शिफारस पत्र असल्यास हे इंजेक्शन दिले जाते.
पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे नियंत्रणाची जबाबदारी आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, त्यांचे नातेवाईक हे इंजेक्शन घेऊन जात आहेत.