corona virus : कोल्हापूर शहरात कोरोनासोबत सारीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:11 PM2020-09-21T13:11:43+5:302020-09-21T13:13:27+5:30
कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) या आजारानेही शहरात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत.
कोल्हापूर : कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस (सारी) या आजारानेही शहरात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत.
शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. १२ हजारांहून अधिक रुग्ण झाले आहेत. यासोबतच इतरही साथीचे आजार पसरत आहेत. चिकनगुनिया, डेंग्यू, व्हायरल ताप यासोबत सारी आजाराची लक्षणे असणारे रुग्ण दिसून येत आहेत.
महापालिकेच्या वतीने माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरात घर ते घर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. यामध्ये कोरोनासदृश लक्षण असणाऱ्यांसोबत इतरही साथीचे आजार असणारे रुग्ण आढळून येत आहेत.
शहरात सारी आजाराची लक्षणे असणारे ३९ रुग्ण सर्वेक्षण मोहिमेत आढळून आले आहेत. सारी आजाराची प्राथमिक लक्षणे कोरोनातही दिसतात; त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
सारीची लक्षणे
- श्वास घ्यायला त्रास
- खूप ताप, सर्दी, खोकला
- फुप्फुसात सूज येणे
- वयोवृद्ध व्यक्ती, बालके व रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांत फैलाव लवकर
माझे कुटुंब - माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. यामध्ये सारीसदृश्य लक्षणे असणारे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार तितकासा गंभीर नाही. मात्र कोरोनाप्रमाणेच लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास वेळीच आरोग्य केंद्रांमध्ये स्राव तपासून घ्यावा.
- डॉ. अशोक पोळ,
आरोग्याधिकारी, महापालिका