corona virus : जिल्हा प्रशासनातर्फे ४२ लाख लोकांची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 06:40 PM2020-09-19T18:40:22+5:302020-09-19T18:42:11+5:30
माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.
कोल्हापूर : राज्य अथवा केंद्र सरकारने निश्चित केलेली एखादी मोहीम राबविण्याकरिता किती मोठी यंत्रणा उभी करावी लागते याचा अंदाज माझे कुटुंब-माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या मोहिमेवरून पहायला मिळते.
या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. ही साथ आटोक्यात आणण्याकरिता राज्य सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतच आहे. म्हणूनच राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेचीही कोल्हापुरात व्यापक पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे.
ही मोहीम महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण अशा तीन पातळीवर राबविली जात आहे. शहरी आरोग्य केंद्रे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून १२०० गावांत सुमारे ५५०८ कर्मचारी घराघरांत जात आहेत.
प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाऊ लागली आहे. व्यक्तीच्या अंगातील ताप, पल्स तसेच ऑक्सिजन पातळी पाहून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. काही लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तींना रुग्णालयात पुढील उपचारकरिता पाठविले जात आहे.