corona virus : दिव्यांगांचा अवलिया जितेंद्र शिंदे, चार महिने भाजीपाला, औषधे मोफत घरपोहोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:12 PM2020-07-27T12:12:35+5:302020-07-27T12:16:48+5:30
कोल्हापुरातील जितेंद्र शिंदे हे रिक्षाचालक गेले चार महिने शहरासह परिसरातील दिव्यांग व गरोदर महिलांना औषधे व भाजीपाला मोफत घरपोहोच करीत आहेत.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोरोनाच्या धास्तीखाली सारे जग घरात असताना कोल्हापुरातील जितेंद्र शिंदे हे रिक्षाचालक दिव्यांगांच्या मदतीला धावून आले आहेत. गेले चार महिने शहरासह परिसरातील दिव्यांग व गरोदर महिलांना औषधे व भाजीपाला मोफत घरपोहोच करीत आहेत.
आतापर्यंत त्यांनी सुमारे ९५० व्यक्तींना अशा प्रकारची मदत केली आहे. मी आणि माझे कुटुंब या मोहजालात अडकलेल्या युगात पदरमोड करून इतरांसाठी धावून जाणारे शिंदे यांच्यासारखे ह्यअवलियाह्ण निश्चितच प्रेरणादायी आहेत.
कोरोनामुळे गेले चार महिने सगळी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात हे संकट कधी जाणार, हे निश्चित माहीत नसल्याने सगळीकडे अस्वस्थता आहे. अशा वातावरणात दिव्यांगांसह समाजातील सामान्य घटकाचे मोठे हाल होत आहेत.
या घटकांना अनेकांनी मदतीचे हात दिले असतील; मात्र गेले चार महिने त्यांना औषधे, भाजीपाला नित्यनियमाने पोेहोच करण्याचे काम टाकाळा, राजारामपुरी येथील जितेंद्र शिंदे यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून ते दिव्यांग, गरोदर महिला यांना कोणताही मोबदला न घेता औषधे व भाजीपाला घरपोहोच करीत आहेत.
शिंदे यांच्या आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने त्यांनी हॉटेलमध्ये काम करून, तिथेच राहून वाटचाल केली. ३० वर्षांपूर्वी रिक्षा घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र, गोरगरिबांविषयीची कणव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच रस्त्यावर एखादा अपघात झाला तर त्याला तत्काळ रुग्णालयात पोहोचवणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढणे यासाठी ते स्वत:हून ते पुढे असतात.
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे मुश्कील होते. अशा काळात दिव्यांग व सामान्य कुटुंबातील गरोदर महिलांचे मोठे हाल झाले. त्यांना घरपोहोच औषधे व भाजीपाला पोहोच करण्याचा संकल्प शिंदे यांनी केला आणि गेले चार महिने ते अविरतपणे हे काम विनामोबदला करीत आहेत. फोन आला की कपिलतीर्थ मार्केट, गंगावेश यांसह शहरातील कोणत्याही मंडईत संबंधित व्यक्तीचे खाते आहे, त्यावर भाजीपाला घेऊन तो घरपोहोच केला जातो.
शहरातून रिक्षा फिरवत असताना रस्त्यात कोणी भिकारी दिसला तर पैसे न देता हॉटेलमध्ये नेऊन त्याला पोटभर खायला द्यायचे. शासनाने सुरू केलेली ह्यशिवभोजनह्ण थाळी विकत घेऊन त्यांचेही वाटप शिंदे करतात.
लहानपणापासून गरिबीचे चटके सोसल्याने अशा संकटाच्या काळात गरजूंना मदत करणे हीच मानवता आहे. म्हणून गेली चार महिने पदरमोड करून हे मदतीचे काम करीत आहे.
- जितेंद्र शिंदे ,
टाकाळा, राजारामपुरी