corona virus : पोलिसांनी केले; आता महापालिकेला करावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:20 PM2020-09-15T12:20:03+5:302020-09-15T12:21:53+5:30
तानाजी पोवार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत, त्यांतील तब्बल नऊजणांचा मृत्यू झाला, ...
तानाजी पोवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत, त्यांतील तब्बल नऊजणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या बाजूला महत्त्वाचा घटक असलेल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पॉझिटिव्ह पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू केले, संरक्षणाची हमी घेतल्याने पोलिसांना काम करण्याची ऊर्मी आली, पोलिसांचे मनोधैर्यही उंचावले. बाधितांपैकी सुमारे ७५ टक्के पोलिसांनी कोरोनला हरवले, तर एकाचा मृत्यू झाला; पण पोलिसांप्रमाणे अद्याप महानगरपालिका प्रशासनाला हे सुचलेले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी, पोलिसांत पॉझिटिव्हचे वाढते प्रमाण पाहता, त्यांनी वैयक्तिक लक्ष घालृून पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी हातकणंगले येथे संजय घोडावत कोविड सेंटरमध्ये उपचाराची स्वतंत्र व्यवस्था केली. पोलीस मृत्युमुखी पडणार नाही याची दक्षता घेतली. बाधित पोलीस, त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यापासून ते त्यांना बेड, औषधोपचार उपलब्ध करून देणे, देखभाल, जेवण देण्यासाठी समन्वयक म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षकांची व्यवस्था केली. प्रत्येक पोलीस उपअधीक्षकांच्या निगराणीखाली बाधित पोलिसांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप केला. रुग्णांना औषधोपचाराइतकेच त्यांचे मनोधैर्य उंचावण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. अशाच पद्धतीने शहरातील मुख्य आस्थापना असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेने पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे; पण अद्याप महापालिकेकडे तशी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. परिणामी केवळ औषधोपचार व आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावरच हे कर्मचारी कोरोनावर मात करीत आहेत.
महानगरपालिकेची चार विभागीय कार्यालये व एक मुख्य प्रशासकीय इमारत आहे. याशिवाय विविध विभाग, समित्या आहेत. सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक कोरोनायोद्धा म्हणून कार्यरत आहेत. अशा सुमारे ५० हून अधिक जणांना सेवा देताना बाधा झाला. मात्र किती अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, किती जणांना कोरोना चाचणीची आवश्यकता आहे, कोरोना संसर्ग झाला, कितीजणांवर उपचार सुरू आहेत, त्यांना बेड, औषध उपलब्ध होतात का, कुटुंबीयांच्या अडचणी काय आहेत, यासाठीही महापालिका प्रशासनाने स्वतंत्र विभाग अथवा सेल कार्यान्वित करणे अपेक्षित आहे.
जिल्हा परिषदेचीही कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था
जिल्हा परिषदेमधील पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही घोडावत कोविड सेंटरमध्ये जागा आरक्षित करून तेथे दाखल केले जाते. काही सदस्यांनी जिल्हा परिषदेतील कोरोनाबाधित शिक्षकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करून कोविड सेंटर उभारली आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि १२ तालुक्यांतील पंचायत समितीमध्ये आतापर्यंत १४६ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह संख्या :
१) कोल्हापूर पोलीस दल
- पोलीस कर्मचारी व अधिकारी : २४०
- डिस्चार्ज घेऊन गेले : १७९
- उपचार घेत आहेत : ५३
- मृत पोलीस संख्या : ०१
२) कोल्हापूर महानगरपालिका
- कर्मचारी व अधिकारी : ५०
- डिस्चार्ज घेऊन गेले : २८
- उपचार घेत आहेत : २२
- मृत पोलीस संख्या : ०९
२) कोल्हापूर जिल्हा परिषद
- कर्मचारी व अधिकारी संख्या : १४६