corona virus : सहा दिवसांच्या कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा जनता रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:20 PM2020-09-09T20:20:07+5:302020-09-09T20:21:45+5:30
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे व्यापारी व उद्योजकांनी मिळून शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू उद्या, शुक्रवारपासून पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अक्षरश: हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, कपिलतीर्थ, शिवाजी चौक, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी ठिकाणी झुंबड उडाली होती.
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे व्यापारी व उद्योजकांनी मिळून शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू उद्या, शुक्रवारपासून पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अक्षरश: हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, कपिलतीर्थ, शिवाजी चौक, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी ठिकाणी झुंबड उडाली होती.
बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे दिवसाकाठी सातशे ते हजार जणांना कोरोनाची लागण होत आहे. वाढत्या कोरोनाच्या कहरामुळे रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व उद्योजकांनी सोमवारी (दि.८) कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये बैठक झाली. या बैठकीत ११ ते १६ सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत जनता कर्फ्यू पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे सहा दिवस सुखकारक जावेत.
या उद्देशाने बुधवारी सकाळपासून लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजारपेठेमध्ये कडधान्ये, तांदुळ, गहू, तर किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अक्षरश: हा परिसर जत्रा फुलते त्याप्रमाणे बहरलेला होता. तर राजारामपुरी, शाहूपुरी येथेही व्यापाऱ्यांकडे किरकोळ दुकानदारांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.
भाजी खरेदीसाठीही सर्वत्र गर्दीच गर्दी होती. अनेकांनी वारंवार खरेदीसाठी यावे लागू नये म्हणून पंचवीस ते पन्नास किलोच्या पटीत खरेदी केली. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे साहजिकच छोट्या हात्तीसारख्या टेम्पोची गरज लागली. त्यामुळे अशी वाहनेच वाहने बाजारपेठेत होती.
बाजारगेट, कपिलतीर्थ, भाऊसिंगजी रोड, शाहूपुरी आदी ठिकाणी असलेल्या तेल व्यापाऱ्यांकडेही तेलाची घाऊक व किरकोळ खरेदीसाठी गर्दी झाली होती.शहरातील मॉल्समध्येही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणीही रांगा व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केले जात होते.