corona virus -कोरोनामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 04:33 PM2020-03-23T16:33:31+5:302020-03-23T16:36:12+5:30
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले.
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने बसेस बंद ठेवाव्या लागत असल्यामुळे ‘केएमटी’वर आर्थिक संकट आले आहे. रविवारी ‘जनता कर्फ्यू’मुळे सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. दिवसभरात आठ लाखांचे नुकसान झाले.
कोरोनो विषाणूमुळे राज्य शासनाने नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तसेच भीतीमुळे स्थानिक नागरिकही फारसे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बस प्रवाशांची संख्या कमी झाली असून, बसेसची संख्या कमी केली आहे.
परिणामी केएमटीला रोज लाखोंचा तोटा होत आहे. यामध्येच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. बस, रेल्वे, एस.टी. बससेवा बंद ठेवण्यात आली होती. के.एम.टी.च्या १०१ बसेस शास्त्रीनगर, बुद्धगार्डन येथील वर्कशॉपमध्ये थांबून होत्या.
उत्पन्न नाहीच, तोटा वाढतोय
बस बंद राहिल्याने रविवारी आठ लाखांचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांमध्ये अशा प्रकारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने आज, सोमवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे बससेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार निघणे अवघड जाणार आहे.
‘केएमटी’कडून आपत्कालीन पथक
कर्फ्यूमुळे जरी बस बंद असल्या तरी रविवारी केएमटी प्रशासनाकडून १० कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन पथक नियुक्त केले होते. सार्वजानिक वाहतूक सेवा बंद असल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांना या पथकाने केएमटी बसमधून ‘सीपीआर’मध्ये आणून सोडले. दिवसभरात १४ प्रवाशांना सेवा देण्यात आली. या पथकामध्ये प्रमोद पाटील यांच्यासह पाच चालक, पाच वाहक होते.