corona virus : संदर्भसेवा नाकारणाऱ्या रुग्णांना पाच हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 02:17 PM2020-10-16T14:17:20+5:302020-10-16T14:23:04+5:30
corona virus, zp, kolhapurnews शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ज्या रुग्णांना संदर्भसेवेची शिफारस करण्यात आली आहे. अशांनी पुढची तपासणी करून घेणे टाळल्यास ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर : शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ज्या रुग्णांना संदर्भसेवेची शिफारस करण्यात आली आहे. अशांनी पुढची तपासणी करून घेणे टाळल्यास ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या प्रस्तावाला गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली आहे. याबाबत गुरुवारी लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतगर्त सर्वेक्षण सुरू आहे. या दरम्यान एलएलआय आणि सारी आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. असे ५६४३ रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना कोरोना चाचणीसाठी स्वॅब देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
स्वॅबला जाण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली. मात्र, यातील १५५१ जणांनी अजूनही स्वॅब दिलेले नाहीत. त्यामुळे समुपदेशन करूनही रुग्णांनी स्वॅब देणे टाळल्यास ५ हजार रुपयांचा आता दंड ठोठावण्यात येणार आहे. आधी २४ तासांची नोटीस देण्यात येईल. त्यातूनही जर संबंधित स्वॅबसाठी गेले नाहीत तर हा दंड वसूल करण्यात येणार आहे.
यापुढच्या काळात केवळ एलएलआय आणि सारीचेच नव्हे तर जे संशयित आहेत अशा सर्वांची १०० टक्के स्वॅब तपासणी करण्यात यावी, असे आदेश अमन मित्तल यांनी दिले आहेत. त्यांनी गुरुवारी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले.