corona virus : मोठा दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:08 PM2020-08-18T12:08:38+5:302020-08-18T12:11:27+5:30
कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूरकरांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात नवीन ५३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरी त्याही पेक्षा जास्त म्हणजे ६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी देखिल नव्याने दाखल होणाऱ्या ५८२ रुग्णांपेक्षा ६९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूरकरांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात नवीन ५३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरी त्याही पेक्षा जास्त म्हणजे ६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी देखिल नव्याने दाखल होणाऱ्या ५८२ रुग्णांपेक्षा ६९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
गेल्या अनेक दिवसात प्रथमच असे चित्र पहायला मिळाले. याचाच अर्थ गेल्या दोन दिवसापासून नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
दरम्यान, सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये दहा पुरुष तर पाच महिलांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील रविववार पेठ, शुक्रवारपेठ, नागाळा पार्क व वर्षानगर या ठिकाणी राहणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला.
त्याखालोखाल इचलकरंजी शहरातील तीनबत्ती चौक, कारंडेमळा व शहापूर रोड याठिकाणच्या तिघांचा, करवीर तालुक्यातील उचगांव, कळंबे तर्फ ठाणे, पाचगांव येथील तिघांचा मृत्यू झाला. शिरोळचे दोन, हातकणंगले तालुक्यातील कोरोची व रेंदाळ येथील दोन तर शाहुवाडी तालुक्यातील उचत येथील एकाचा मृत्यू झालेल्यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूरकरांकरिता रविवार व सोमवार हे दोन दिवस थोडासा आधार देणारे ठरले. रविवारी ५८२ रुग्ण दाखल झाले तर ६९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सोमवारी ५३६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली, तर त्याचवेळी ६९० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. गेले काही दिवस नवीन रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती, परंतू सलग दोन दिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. ही बाब आरोग्य यंत्रणेवरी भार हलका करणारी आहे.
कोल्हापूर शहरात सर्वाधिक रुग्ण
गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरात सर्वाधिक १३९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ग्रामिण भागात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६ नवीन रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल करवीर तालुक्यात ५६ रुग्ण आढळले. याशिवाय भुदरगड तालुक्यात १५ चंदगड तालुक्यात आठ, गडहिंग्लज तालुक्यात १३ , गगनबावडा तालुक्यात सहा, कागल तालुक्यात नऊ, पन्हाळा तालुक्यात आठ, राधानगरी तालुक्यात १६, शाहूवाडी तालुक्यात १०, शिरोळ तालुक्यात २९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.
तपासणी अहवालही आता झटपट
सोमवारी कोरोना चाचणीचे अहवाल देखील मोठ्या संख्याने आले. सर्वसाधारण चाचणीचे १६०७ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी १३६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ॲन्टीजेन तपासणीचे ६९४ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ५५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
याशिवाय खासगी रुग्णालयात तपासणी झालेल्या १५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शेंडापार्क येथील प्रयोगशाळेत तीन मशिन कार्यरत असून ती पूर्ण क्षमतेने काम करीत असल्यामुळे एका दिवसात जवळपास २३०० अहवाल मिळाले.
तालुका निहाय आकडेवारी -
आजरा - २४९, भुदरगड - ३२४, चंदगड - ४६२, गडहिंग्लज - ३९२, गगनबावडा - ३८, हातकणंगले - १६११, कागल - २७९, करवीर - १६४९, पन्हाळा - ४८२, राधानगरी - ३८९, शाहूवाडी - ३९५, शिरोळ - ७४३, नगरपालिका - ३११३, कोल्हापूर महानगरपालिका - ४७५९, इतर जिल्हा - ३८८.
- एकूण रुग्ण संख्या - १५,२७३
- बरे झालेले रुग्ण - ७५९६
- आतापर्यंत मयत - ४२०
- उपचार घेत असलेले रुग्ण - ७२५७