corona in kolhapur- पालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:16 PM2020-03-26T18:16:09+5:302020-03-26T18:19:51+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे.
कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे. दूध, धान्य, भाजीपाला, गॅस आणि औषधे सुलभरीत्या उपलब्ध होऊ शकतात, हे जर लोकांना समजले तर ते रस्त्यांवर येणार नाहीत. त्यामुळे ते या गोष्टींसाठी पॅनिक होणार नाहीत, याची काळजी पालकमंत्र्यांनी घेतली आहे.
या संकटात राज्य शासन जसे लोकांच्या मदतीला धावून येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे, तसाच अनुभव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाबाबत लोकांना येत आहे आणि या प्रशासनामध्ये समन्वय ठेवून त्यांना दिशा देण्याचे काम सतेज पाटील यांच्याकडून सुरू आहे.
सकाळी अंघोळ झाली की ते जिल्हाधिकारी कार्यालयात येतात ते रात्रीच कधीतरी घरी जातात. कुणाचा मुलगा पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापूरला आणायचा आहे, येथपासून ते शहरातील लोकांना भाजीपाला कसा उपलब्ध होईल;. ग्रामीण भागात गावसमितीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कसा होईल, यावरही ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एकाच वेळी रुग्णालयांतील व्यवस्था, रुग्णतपासणी, त्यांचे विलगीकरण यांकडेही त्यांचे तितकेच लक्ष आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी होम क्वारंटाईनमधील लोकांची यादी घेऊन त्यांतील प्रत्येक व्यक्तीशी स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधायला लावला. त्यांना धीर दिला. प्रांताधिकारी, तहसिसीलदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांची यंत्रणा कामाला लावली.
या सगळ्यांचे फलित म्हणून उपचारांपासून लोकांच्या नागरी सेवासुविधांपर्यंत कुठेही गोंधळ, तक्रारी असल्याचे चित्र नाही. सारा जिल्हा एकजुटीने या संकटाला सामोरे जात आहे, असा दिलासा लोकांना मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांचा सातत्याने संपर्क
पालकमंत्री पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दैनंदिन घडामोडींचा आढावा घेत आहेत. उपाययोजनेसह शासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत.