corona virus - एका दिवसात दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:00 PM2020-04-04T14:00:35+5:302020-04-04T14:02:45+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला लागल्यामुळे खरबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने दि. १८ मार्च पासून घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. तातडीने त्याची अंमलबजावणीही सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत ३१ हजार ६२३ घरांत महापालिकेचे कर्मचारी पोहोचले असून, एक लाख २२ हजार ८८९ लोकांच्या आरोग्याची तपासणी केली.
या सर्वेक्षणात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे नोंदी करून घेतल्या आहेत. घरातील व्यक्ती, त्यांचे देश आणि परदेशात झालेले प्रवास, त्यांच्यापैकी कोणाला सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आहेत का, याची सगळी माहिती नोंदवण्यात येत आहे.
१५ फेब्रुवारी नंतर परदेशवारी तसेच देशांतर्गत प्रवास केलेल्या व्यक्तींची नोंद वेगळी ठेवली आहे. या सर्वेक्षणात १५ फेब्रुवारीनंतर परदेशवारी केलेले ९१ नागरिक मिळून आले. त्यांच्यापैकी सर्दी, ताप, खोकला, इत्यादी लक्षणे आढळून आलेली एकच व्यक्ती आढळली. तसेच या सर्व्हेमधील तपासणीकरिता पाठविण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या २८ इतकी असून, त्यांनाही कसली बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत हे सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.