corona virus : कोटातून आलेल्या विद्यार्थ्यांचा कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 02:48 PM2020-06-19T14:48:14+5:302020-06-19T14:50:30+5:30
कोटा (राजस्थान) येथून घरी सुखरूप आलेल्या ४० विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरोधातील लढ्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनास ४५ हजार रुपयांची मदत केली. या निधीचा धनादेश त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या एस.टी. चालकांना पालकांनी आठ हजार रुपयांचे बक्षीस दिले.
कोल्हापूर : कोटा (राजस्थान) येथून घरी सुखरूप आलेल्या ४० विद्यार्थी आणि पालकांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोना विरोधातील लढ्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनास ४५ हजार रुपयांची मदत केली. या निधीचा धनादेश त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. या विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या एस.टी. चालकांना पालकांनी आठ हजार रुपयांचे बक्षीस दिले.
कोटा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी कोल्हापुरात आल्यावर त्यांना प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथील वसतिगृहात इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले होते. मात्र त्यांच्या शैक्षणिक अभ्यासासाठी त्यांना घरी जायचे होते. या विद्यार्थी, पालकांनी पालकमंत्री पाटील यांना विनंती करून घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचित केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालकांचे हमीपत्र घेऊन त्यांना घरी सोडले.
घरी गेल्याने या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरळीत झाला. त्यावर त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत ४५ हजारांचा धनादेश पालकमंत्री पाटील यांच्याकडे दिला. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उद्योगपती महावीर गाट, माजी राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू लाटकर, उद्योगपती जयेश ओसवाल, पालकांच्या वतीने उदय वाशीकर, श्वेता वाशीकर, सुहास पाटील, शिवाजी पाटील, महेश टोणे उपस्थित होते.
दरम्यान, या विद्यार्थ्यांना कोल्हापुरात आणण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर यांचे सहकार्य लाभल्याचे पालकांनी सांगितले.