corona Virus in kolhapur : कोल्हापूर शहरात प्रतिसाद... ग्रामीणमध्ये फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:16 PM2021-06-12T18:16:11+5:302021-06-12T18:19:12+5:30
CoronaVirus Kolhapur : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली, शनिवारी कोल्हापूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहिले. शाहूपुरी, राजारामपुरीसह शहराच्या इतर ठिकाणी बहुतांशी दुकाने बंद राहिली. मात्र, लक्ष्मीपुरीमध्ये भाजीपाला, फळांसह कडधान्याची दुकाने सुरू राहिल्याने काहीसी गर्दी दिसत होती. ग्रामीण भागात मात्र सगळे व्यवहार सुरू राहिल्याने वीकेंड लॉकडाऊनचा काहीसा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोल्हापूर : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली, शनिवारी कोल्हापूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहिले. शाहूपुरी, राजारामपुरीसह शहराच्या इतर ठिकाणी बहुतांशी दुकाने बंद राहिली. मात्र, लक्ष्मीपुरीमध्ये भाजीपाला, फळांसह कडधान्याची दुकाने सुरू राहिल्याने काहीसी गर्दी दिसत होती. ग्रामीण भागात मात्र सगळे व्यवहार सुरू राहिल्याने वीकेंड लॉकडाऊनचा काहीसा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन केला होता. मात्र, राज्यातील रुग्णांची संख्या कमी होत गेल्यानंतर रुग्णसंख्या व उपलब्ध बेड याचा ठोकताळा घालून राज्य सरकारने जिल्हानिहाय लॉकडाऊनचे नियम बनवले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक आहे. त्यानुसार व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, संपूर्ण राज्यात शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी कोल्हापूर शहरात सकाळच्या टप्प्यात भाजीपाल्यासह इतर खरेदीसाठी काहीसी गर्दी दिसत होती. मात्र, सकाळी दहानंतर ही गर्दी कमी झाली.
एरव्ही गजबजलेल्या राजारामपुरी परिसरातील बहुतांशी दुकाने बंद होती. मेडिकल, भाजीपाला, दवाखान्यासमोर काहीची गर्दी दिसत होती. शाहूपुरी, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही भाजीमंडई वगळता इतर ठिकाणी शांतता होती. लक्ष्मीपुरीत मात्र फळे, भाजी विक्रेत्यांसह कडधान्य विक्री सुरूच होती. त्यामुळे या परिसरात ग्राहकांची काहीसी रेलचेल दिसत होती. दुपारी चारनंतर मात्र भाजीपाल्यासह इतर दुकाने बंद झाल्याने शहरातील गर्दी कमी झाली होती.