corona virus in kolhapur- कोल्हापुरात नीरव शांतता, रस्ते पडले ओस, वातावरण भीतीदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:54 PM2020-03-25T17:54:37+5:302020-03-25T17:56:21+5:30

चौकाचौकात पोलिसांचा खडा पहारा. रस्त्यावरून जाणारे एखादं दुसरे वाहन, कुठेतरी दूरवर बसलेले भाजी विक्रेते, घाईगडबडीत भाजी खरेदी करणारे मोजकेच ग्राहक, औषधांच्या दुकानात दिसणारी हालचाल, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी, मात्र ग्राहकांची प्रतीक्षा, अशा नीरव शांततेत बुधवारी कोल्हापूरकरांनी कोरोना विषाणूपासून बचावाचा पवित्रा घेतला.

corona virus in kolhapur-silence in Kolhapur | corona virus in kolhapur- कोल्हापुरात नीरव शांतता, रस्ते पडले ओस, वातावरण भीतीदायक

corona virus in kolhapur- कोल्हापुरात नीरव शांतता, रस्ते पडले ओस, वातावरण भीतीदायक

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात नीरव शांतता, रस्ते पडले ओसवातावरण भीतीदायक : लोकांचा प्रतिसाद

कोल्हापूर : चौकाचौकात पोलिसांचा खडा पहारा. रस्त्यावरून जाणारे एखादं दुसरे वाहन, कुठेतरी दूरवर बसलेले भाजी विक्रेते, घाईगडबडीत भाजी खरेदी करणारे मोजकेच ग्राहक, औषधांच्या दुकानात दिसणारी हालचाल, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी, मात्र ग्राहकांची प्रतीक्षा, अशा नीरव शांततेत बुधवारी कोल्हापूरकरांनी कोरोना विषाणूपासून बचावाचा पवित्रा घेतला. १४ एप्रिलपर्यंत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर होताच, कोल्हापूरकरांच्या उरात धडकीच भरली आणि स्वयंशिस्त म्हणून घरातच बसून राहणे पसंत केले.

बुधवारी मराठी वर्षारंभाचा पहिला दिवस अर्थात ‘गुढी पाडवा’ असल्याने नेहमीसारखे उत्साही वातावरण शहरात कुठेच दिसले नाही. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होते, पण यंदाच्या पाडव्यावर आणि खरेदीच्या उत्साहावर ‘कोरोना’चे संकट आल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. कुठेही कसलीही खरेदी झाली नाही.

जी काही मोजकी खरेदी झाली असेल ती केवळ आणि केवळ जीवनावश्यक वस्तूंची, भाजीचीच झाली. गुढी पाडव्याच्या दिवशी दुकाने अथवा संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्याचा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने हा एक अभूतपूर्व प्रसंग होता.

शनिवारपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाची धास्ती वाटायला लागलेली आहे. सुदैवाने कोल्हापूर जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त सापडलेला नसला तरी जगाच्या पातळीवर त्याचा होत असलेला प्रचंड फैलाव पाहून कोल्हापूरकरांच्या मनातही मोठी भीती निर्माण झाली आहे. त्याचेच प्रतिबिंब बुधवारी शहरात पहायला मिळाले.

औषध दुकाने, नियंत्रित केलेली भाजी मंडई, जीवनावश्यक वस्तू विकणारी दुकाने हीच काय ती उघडी होती. पेट्रोलपंपदेखील सुरू होते, मात्र तेथील लगबग, खरेदी अगदीच नगण्य होती. बाकी संपूर्ण कोल्हापूर शहर बंदच्या छायेत सामावले होते. सगळीकडे नीरव शांतता होती. अधूनमधून ही शांतता भेदत जाणारे एखादेच वाहन रस्त्यावर जाताना दिसत होते. तेवढाच काय तो आवाज होत होता.

शहर निर्जंतुकीकरणास सुरुवात

संपूर्ण कोल्हापूर जिल्हा बंद असला तरी जिल्हा प्रशासनाबरोबरच महानगरपालिका व जिल्हा परिषद, शासकीय आरोग्य विभाग, सीपीआर, आयसोलेशन हॉस्पिटल, इचलकरंजीतील आयजीएम, गडहिंग्लज येथील उपरुग्णालय यासह खासगी दवाखाने सुरूराहिले. महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच अग्निशमन दलातर्फे संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभागातर्फे चार ट्रॅक्टर स्प्रिंकलर औषध फवारणीचे काम अव्याहतपणे सुरू आहे. गुरुवारी अग्निशमन दलाच्या जवानांनीही या कामात भाग घेतला.

विक्रेत्यांना पट्टे मारून दिले

लक्ष्मीपुरी भाजी मंडई व बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेतर्फे भाजी विक्रेत्यांचे फेरनियोजन केले आहे. आईसाहेब महाराज पुतळा ते फोर्ड कॉर्नर या परिसरात ३० हून अधिक भाजी विक्रेत्यांना दहा फूट अंतर ठेऊन बसविण्याकरिता पांढरे पट्टे मारून देण्यात आले आहेत. तसेच कपिलतीर्थ भाजी मंडई समोरील ताराबाई रोडवरील महाद्वार चौक ते तटाकडील तालीमपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा फूट अंतरावर पट्टे मारण्यात आले आहेत.

उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रमोद बराले यांनी बुधवारी दुपारपर्यंत हे नियोजन पूर्ण केले. गुरुवारपासून सर्व भाजी विक्रेत्यांना लक्ष्मीपुरीत गर्दी न करता आखून दिलेल्या पट्ट्यातच बसण्याची सक्ती केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
 

 

Web Title: corona virus in kolhapur-silence in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.