corona virus -लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 02:11 PM2020-03-24T14:11:21+5:302020-03-24T14:13:52+5:30
शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.
कोणतेही आंदोलन हिंसक झाले तर सरकारला जाग आणण्यासाठी एस.टी.बस गाडीची तोडफोड केली जाते. खासगी वाहनांची तोडफोड करून शासन तितके गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलनकर्ते नेहमी एस. टी. बसेसना टारगेट करतात.
आंदोलनामुळे काहीवेळा बसेस जाळण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांच्या हितासाठी चोवीस तास एस.टी. बस रस्त्यांवर असते, त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी आंदोलकांनी एस. टी. बसेसना टारगेट करू नये, अशी विनंती वारंवार महामंडळाच्यावतीने केले जाते, त्याकडे कोणी गांभीर्याने पाहात नाही, असे चित्र पहाण्यास मिळते.
नैसर्गिक आपत्तीपुढे हतबल
कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात प्रथमच पुरामुळे ५ ते ११ आॅगस्ट दरम्यान सात दिवस वाहतूक शंभर टक्के बंद होती. कोरोना विषाणू रोखण्यासाठी प्रथमच लॉकडाऊनमुळे एस.टी. वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
या कारणास्तव कोल्हापूर विभागातील वाहतूक बंद
- भारत बंद आंदोलनामुळे (५ जुलै २०१०)
- पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेला बंद (३१ मे २०१२)
- शेतकरी संघटना ऊस दराबाबत ‘रस्ता बंद’ आंदोलन (११ व १२ नोव्हेंबर २०१२)
- टोल बंद आंदोलन (२१ जानेवारी २०१३)
- टोल आंदोलन (१७ आॅक्टोबर २०१३)
- गतवर्षीच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाच्या धास्तीने (२८ नोव्हेंबर २०१३)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुराचा पडसाद (६ आॅगस्ट २०१४)
- गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद - (२२ फेब्रुवारी २०१५)
- बहुजन क्रांती मोर्चा (१४ डिसेंबर २०१६)
- एस.टी. वर्कर्स काँग्रेस संप (इंटक)
- महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती संप - १७, १८, १९ आॅक्टोबर २०१७
- भीमा कोरेगाव (१ जानेवारी २०१८)
- दूध दरवाढ आंदोलन (१७ ते २० जुलै २०१८)
- राज्य परिवहन कर्मचारयांच्या संपामुळे बंद (८ व ९ नोव्हेंबर २०१८)
- मराठा क्रांती महाराष्ट्र बंद (२४ जुलै २०१८)
- मराठा क्रांती ठोक मोर्चा (९ आॅगस्ट २०१८)