corona virus : महापौरांची कोरोना केअर सेंटरला भेट, रुग्णांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:25 PM2020-08-25T18:25:47+5:302020-08-25T18:31:35+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण ...
कोल्हापूर : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामधील शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी व अंडी उबवणी केंद्र येथील कोविड केअर सेंटरला मंगळवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवासुविधांची माहिती घेऊन त्याबाबत रुग्णांशी चर्चा केली. अंडी उबवणी केंद्र येथील कोरोनामुक्त झालेल्या बुरुड गल्ली येथील रुग्णाने व नातेवाइकांनी या ठिकाणी असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर येथील डॉक्टर्स व परिचारिकांशी संवाद साधताना महापौर आजरेकर यांनी सर्वांनी स्वतःबरोबरच रुग्णांची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पाटबंधारे विभागाचे साहाय्यक अभियंता अनिल जाधव, प्रशासक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे उपस्थित होते.
८६७ रुग्ण उपचार घेऊन घरी
शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी या सेंटरमधून आत्तापर्यंत १९०० व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण केले होते; तर आत्तापर्यंत येथून ७०० पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अंडी उबवणी केंद्र येथे आत्तापर्यंत २०१ रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण केले होते. आत्ता येथून १६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत; तर २६ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली.