corona virus - नागरिकांनी घरात बसावे म्हणून महापौर उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 06:21 PM2020-03-24T18:21:29+5:302020-03-24T18:22:23+5:30
राज्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतु कोल्हापूर शहरात अजूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निलोफर आजरेकर स्वत: रस्त्यावर उतरून भाजी मंडई व व्यापार पेठेत जाऊन नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर : राज्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतु कोल्हापूर शहरात अजूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निलोफर आजरेकर स्वत: रस्त्यावर उतरून भाजी मंडई व व्यापार पेठेत जाऊन नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.
मंगळवारी सकाळी त्यांनी शाहूपुरी व्यापार पेठ, लक्ष्मीपुरी भाजी मंडई, महाद्वार रोड, कपिलतीर्थ मार्केट, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट, कुंभार गल्ली भाजी मंडई, बाजार गेट, पानलाईन, मटण मार्केट, शिवाजी चौक याठिकाणी फिरती करून सर्व नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.
नागरिकांनी गर्दी करू नये, प्रत्येक भाजी विक्रेत्याने अंतर ठेवावे, दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, इतरांना बाहेर ठरावीक अंतरावर उभे करावे, असे आवाहन महापौरांनी केले. तसेच जे बाहेर गावावरून कोल्हापुरात आलेले आहेत व ज्यांच्यावर होम कोरोनटाईन असा शिक्का मारलेला आहे. त्यांनी घरामध्येच बसावे बाहेर फिरू नये. आपण जर बाहेर फिरताना आढळल्यास आपल्याला स्वतंत्र अलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाईल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी अग्निशमन विभागाचे पथक त्यांच्याबरोबर होते. यावेळी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी दस्तीगीर मुल्ला, मनीष रणभिसे, आश्पाक आजरेकर, अग्निशमन व मार्केट विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.