corona virus : नेशन फर्स्टचा उपक्रम, रुग्णाला घरपोच ऑक्सिजन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 02:10 PM2020-09-14T14:10:13+5:302020-09-14T14:14:22+5:30
कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची सोय द नेशन फर्स्ट यांनी केली आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णाला एका फोनवर ऑक्सिजन मशीन दिले जात असल्याची माहिती अवधूत भाटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची सोय द नेशन फर्स्ट यांनी केली आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णाला एका फोनवर ऑक्सिजन मशीन दिले जात असल्याची माहिती अवधूत भाटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये म्हटले आहे की, सरकारी, खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. काही रुग्णांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. रुग्णांची ही दयनीय अवस्था लक्षात घेता द नेशन फर्स्ट मदत नाही कर्तव्य या अंतर्गत राष्ट्रहित सर्वोपरी हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, अशा रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या सुविधेमुळे घरातच रुग्णाला ठेवून नातेवाइकांना बेड शोधण्यास मदत होईल. बेड उपलब्ध झाल्यानंतर हे मशीन दुसऱ्या रुग्णाला उपयोगात आणता येते. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे मशीन वापरणे अत्यंत सोपे आहे.
यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पत्र, रुग्ण व जवळच्या नातेवाइकाचे ओळखपत्र, फोटो व संस्थेच्या नावे मागणीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. मशीनसाठी ८३७९०२८३३३, ९९६०६०१०३० या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
तालीम संस्था, मंडळांनी पुढाकार घ्यावा
ज्या पद्धतीने आपण एकत्र येऊन महापुरावर सहज मात केली, अनेकांचे संसार वाचवले, त्याच पद्धतीने प्रत्येक तालीम, संस्था, मंडळ, दानशूर व्यक्ती यांनी एक मशीन अशा पद्धतीने खरेदी केले तर अनेकांचे जीव वाचतील, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही भाट्ये यांनी केले.