corona virus : गावामध्येच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा नवा कोल्हापूर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:47 AM2020-07-28T10:47:03+5:302020-07-28T10:54:05+5:30

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गावातच उपचार करण्याचा नवा कोल्हापूर पॅटर्न राबविण्याचा सध्या प्रशासनाकडून विचार सुरू आहे. याबाबत वडणगे ...

corona virus: New Kolhapur pattern of treating corona patients in the village itself | corona virus : गावामध्येच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा नवा कोल्हापूर पॅटर्न

corona virus : गावामध्येच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा नवा कोल्हापूर पॅटर्न

Next
ठळक मुद्दे गावामध्येच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा नवा कोल्हापूर पॅटर्न वडणगे ग्रामपंचायतीचा पुढाकार, प्रशासन सकारात्मक

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गावातच उपचार करण्याचा नवा कोल्हापूर पॅटर्न राबविण्याचा सध्या प्रशासनाकडून विचार सुरू आहे. याबाबत वडणगे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून, या प्रस्तावाला जर अंतिम मंजुरी मिळाली तर ते रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

याबाबत पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, यासाठी आरोग्य विभागाचे म्हणणे घेण्यात येणार आहे.

वडणगे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता व नियंत्रण ग्राम समितीने यापुढील काळात कोरोनाबाधित रुग्णांवरल ग़ह अलगीकरणात उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरपंच सचिन चौगले, प्राचार्य डॉ महादेव नरके व डॉ. संदीप पाटील यांनी वडणगे येथील १३ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यांनीही अशा पद्धतीने उपचार करण्यास तत्काळ होकार दिला. याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काही रुग्णांना तर बेडही मिळत नाहीत. याची जिल्हा प्रशासनासमोर मोठी अडचण आहे. अशा परिस्थितीत आपण एक पाऊल पुढे येऊन स्वतः जबाबदारी घेण्याचा निर्णय वडणगे ग्रामपंचायत व कोरोना दक्षता ग्रामसमितीने घेतला आहे.

रुग्णास सौम्य लक्षणे असतील आणि घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल तर घरी किंवा मग शाळेमध्ये उपचार करणे, ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग योजनेतून व ग्रामपंचायत निधीतून पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, वाफेचे यंत्र, आवश्यक औषधे, आवश्यक आहार पुरविणे, तपासणीसाठी डॉक्टर, स्वयंसेवकाची नियुक्ती करणे जे दिवसातून तीन ते चार वेळ रुग्णाशी व्हिडिओ अथवा व्हॉइस कॉलवर संपर्क करून उपचारांबाबत मार्गदर्शन करतील आणि अगदीच गरज पडल्यास डॉक्टरांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी गरज पडल्यास दाखल करणे असे या योजनेचे स्वरूप आहे.

सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, समिती सचिव उमेश नांगरे, पं. स. सदस्य इंद्रजित पाटील, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके, दीपक व्हरगे, रमेश कुंभार, सूरज पाटील, अमर टिटवे, उत्तम साखळकर, माणिक जाधव, अमर चौगले, महालिंग लांडगे, राजू पोवार, दादासो शेलार, संजय देवणे यांच्या चर्चेतून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

प्रसंगी शाळांमध्ये होणार उपचार

कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या इमारतींमध्ये रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा १९०० शाळांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता चार हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेली आहे. अजूनही ही संख्या कमी होत नसल्याने, तसेच आता लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा संख्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने जिल्हा, तालुका पातळीवरील रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी नागरिकांचे स्राव घेण्यापासून ते रुग्णांवर उपचार करण्यापर्यंतची सोय उपलब्ध करून दिली आहे.

संजय घोडावत विद्यापीठापासून ते शिवाजी विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर स्थापन करून या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याचे काम सुरू आहे.

परंतु, कोल्हापूर शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये आता जागा उपलब्ध नाही असे सांगितले जाते. डॉ. डी. वाय. पाटील रग्णालयावरदेखील ताण येत आहे. सीपीआरमध्ये तर सातत्याने रुग्णांची भरती केली जात आहे. त्यामुळे आता लक्षणे नसणाऱ्यांना घरीच उपचार देण्याबाबत नियोजन सुरू आहे. यातूनही संख्या वाढत राहिली आणि जागा शिल्ल्क नसेल तर मात्र त्या त्या गावातील शाळेमध्ये उपचार करण्याचे हे नियोजन आहे.


वडणगे ग्रामपंचायतीने सर्वंकष विचार करून हा प्रस्ताव तयार केला आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि प्रशासन यासाठी सकारात्मक विचार करेल, असा आम्हला विश्वास आहे. जर आरोग्य विभागाकडून याला मान्यता मिळाली तर महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग ठरणार असून, आम्ही सर्वजण यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
-सचिन चौगले, 
सरपंच, वडणगे

Web Title: corona virus: New Kolhapur pattern of treating corona patients in the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.