corona virus : कोल्हापुरात कोरोनामुळे नऊजणांचा मृत्यू; २२९ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:02 PM2020-07-28T20:02:53+5:302020-07-28T20:03:55+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कुठे धक्का तर कुठे दिलासा मिळत असला तरीही मंगळवारी दिवसभरात २०८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले. नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना वाढत असलेल्या बाधित आणि मृत्यूंची संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कुठे धक्का तर कुठे दिलासा मिळत असला तरीही मंगळवारी दिवसभरात २०८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले. नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना वाढत असलेल्या बाधित आणि मृत्यूंची संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवत आहे.
येथील सीपीआर रुग्णालयाने मंगळवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. २७) रात्री ते मंगळवारी दुपारपर्यंत २०८ रुग्ण आढळून आले होते. सायंकाळपर्यंत या संख्येत आणखी १०० रुग्णांची भर पडल्याचे सांगण्यात येत होते; परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नऊजणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांसह सात पुरुषांचा समावेश आहे.
मृतांपैकी पाच व्यक्ती कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ, साळोखेनगर, उत्तरेश्वर, शनिवार पेठ, खरी कॉर्नर या परिसरांत राहणाऱ्या होत्या. इचलकरंजी शहरातील खंजिरे मळा व लायकर टॉकीजजवळील, तर करवीर तालुक्यातील सांगरूळ फाटा व पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १३८ वर जाऊन पोहोचली.
मंगळवारी कोल्हापूर शहरात ५१, करवीर तालुक्यात १६, पन्हाळा तालुक्यात १०, शिरोळ तालुक्यात ३९, गडहिंग्लज शहरात सात, आजरा शहरात चार, तर राधानगरी तालुक्यात चार रुग्ण आढळून आले. आजरा शहरात ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४८२९ कोरोनाचे रुग्ण झाले असून त्यातील १९३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांपैकी २७५६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी या दोन शहरांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत.