corona virus : शिवाजी विद्यापीठाकडून यंदा शुल्कवाढ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:21 PM2020-08-11T17:21:24+5:302020-08-11T17:22:39+5:30
शिवाजी विद्यापीठाकडून यंदा विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची शुल्कवाढ करण्यात येणार नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत शुल्कवाढ स्थगित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून यंदा विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची शुल्कवाढ करण्यात येणार नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत शुल्कवाढ स्थगित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहेत. या अभ्यासक्रमांचे शुल्क यावर्षी दहा टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्याची अंमलबजावणीदेखील केली जाणार होती.
मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार विद्यापीठ अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू असणाऱ्या विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची यावर्षीची शुल्कवाढ स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मंगळवारी दिली.
ऑनलाईन अध्यन, अध्यापन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दक्षता म्हणून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अध्यन, अध्यापन हे ऑनलाईन पद्धतीने करावे, अशी सूचना विद्यापीठाने विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांना केली आहे.