corona virus -‘जनता कर्फ्यू’ दिवशी आवाजाची पातळी कमी, कोल्हापूरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:02 PM2020-03-23T18:02:40+5:302020-03-23T18:06:09+5:30
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूरमधील नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ कडकडीतपणे पाळला. त्यामुळे शहरातील विविध परिसरात दिवसभर आवाजाची पातळी कमी राहिली.
कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूरमधील नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ कडकडीतपणे पाळला. त्यामुळे शहरातील विविध परिसरात दिवसभर आवाजाची पातळी कमी राहिली.
ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा एकाही ठिकाणी ओलांडली नाही. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणी, आवाजाच्या पातळीच्या मोजणीतून हे चित्र स्पष्ट झाले.
रहिवासी क्षेत्रात राजारामपुरीतील आवाजाची पातळी अधिक राहिली. ती ४६.६१ डेसिबल होती. त्यापाठोपाठ मंगळवारपेठ (४५.५०), शिवाजीपेठ (४३.८९), उत्तरेश्वर पेठ (४३.५४), ताराबाई पार्क (३९.९१), नागाळा पार्क (३९.९१) आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये राजारामपुरी (४७.०४) आघाडीवर होती. त्यानंतर लक्ष्मीपुरी (४५.५९), मिरजकर तिकटी (४५.२५), बिनखांबी गणेश मंदिर (४४.८०),शाहूपुरी (४२.६३), महाद्वाररोड (४४.५९), गंगावेश (४३.३६), पापाची तिकटी (४२.४०), गुजरी कॉर्नर (४१.१८), बिंदू चौक (४२.०३) आहे.
शांतता क्षेत्रात सीपीआर (४४.४२) पुढे होते. त्यापाठोपाठ न्यायालय (३९.४७), जिल्हाधिकारी कार्यालय (३६.६१), शिवाजी विद्यापीठ (३६.१४) राहिले. औद्योगिक क्षेत्रामध्ये शिवाजी उद्यमनगर (३५.६१), वाय. पी. पोवारनगर (३५.१०) असे चित्र राहिले. संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, अजय गौड यांनी पाहणी केली असल्याची माहिती पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांनी सोमवारी दिली.
आवाज कमी होण्याची कारणे
- रस्त्यावर नसलेली वाहने
- सर्व व्यवहार बंद राहिले
- माणसे घराबाहेर पडले नाहीत
आवाज वाढविण्याची कारणे
- घरातील उपकरणे, बोलण्याचा आवाज
- रस्त्यावर खेळणारी मुले
- रुग्णवाहिकांचा आवाज
- पक्ष्यांचा आवाज
ध्वनीची मर्यादा अशा
- क्षेत्र डेसिबल
- औद्योगिक ७५
- व्यावसायिक ६५
- रहिवासी ५५
- शांतता ५०