corona virus : जिल्ह्यात कोरोना नवीन रुग्णांचे प्रमाण नऊ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:27 PM2020-10-22T20:27:45+5:302020-10-22T20:30:03+5:30
coronavirus, muncipaltycarporation, kolhpaurnews कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना महामारीची परिस्थिती कमालीची सुधारली असून, नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.४७ टक्क्यांपर्यंत खाली गेले असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातही आणखी एक समाधानाची बाब अशी की, जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर तिघांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना महामारीची परिस्थिती कमालीची सुधारली असून, नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.४७ टक्क्यांपर्यंत खाली गेले असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातही आणखी एक समाधानाची बाब अशी की, जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर तिघांचा मृत्यू झाला.
जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रचंड उद्रेक झाला होता, त्याच्या तुलनेत आता रुग्णांची संख्या घटली आहे आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ही साथ आता आरोग्य यंत्रणेच्या पूर्ण नियंत्रणात असून ती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.
गुरुवारी जिल्ह्यात केवळ ७४ नवीन रुग्ण आढळून आले. नवीन रुग्णांचे प्रमाण ९.४७ टक्के आहे; तर ७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यामुळे ९२.४६ टक्क्यांवर पोहोचले. नवीन रुग्णांची संख्या घटणे आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढणे यांमुळे आरोग्य यंत्रणा आता निवांत झाली आहे.
केवळ तिघांचा मृत्यू
जिल्ह्यात गुरुवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. शाहूवाडीतील ४२ वर्षीय पुरुष, शिरोळमधील नांदणी गावचे ६३ वर्षांचे रुग्ण, तर इस्लामपूर येथील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
तीन तालुक्यांत एकही रुग्ण नाही
आजरा, कागल व शाहूवाडी या तीन तालुक्यांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा, राधानगरी या चार तालुक्यांत प्रत्येकी केवळ एकाच रुग्णाची नोंद झाली. पन्हाळा तालुक्यात दोन, चंदगड तालुक्यात तीन, हातकणंगले तालुक्यात आठ, करवीर तालुक्यात चार, तर शिरोळ तालुक्यात पाच रुग्ण आढळले. कोल्हापूर शहरात मात्र ४० नव्या रुग्णांची भर पडली.
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या - ४७ हजार ६४३
- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - ४४ हजार ०५३
- मृत रुग्णांची एकूण संख्या - १६१७
- उपचार घेणारे रुग्ण - १९७३