corona virus : परजिल्ह्यांतील कोरोना निगेटिव्ह लोकांनाच प्रवेश द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:25 AM2020-07-27T11:25:57+5:302020-07-27T11:28:27+5:30
परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची ज्या-त्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधूनच स्रावतपासणी करून घ्यावी. ती निगेटिव्ह आली असेल तरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी द नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूर : परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची ज्या-त्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधूनच स्रावतपासणी करून घ्यावी. ती निगेटिव्ह आली असेल तरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी द नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्याला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते; परंतु अनलॉक १ मध्ये इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे फ्री टू ट्रॅव्हल सर्टिफिकेट घेऊन ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आणि नेमका इथेच घोळ झाला.
आता कोल्हापूरकरांनी स्वतःहून अत्यंत कडक लॉकडाऊन पाळलेला आहे; पण समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असल्याने रुग्णसंख्या दिवसागणिक शेकडोंनी वाढत आहे, उपचारासाठी बेड कमी पडत आहेत.
खासगी हॉस्पिटल मात्र महागडे उपचार देत आहेत, जे सर्वसामान्य लोकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे सर्व खासगी लॅबमधील स्राव तपासणीचे शुल्क या महामारीच्या काळात जास्तीत जास्त ५०० रुपये ठेवावे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वतःहून स्राव देता येईल व कोरोनाबाबत वेळीच दक्षता घेता येईल. ज्या ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिबा फुले योजना कार्यान्वित आहे, त्या रुग्णालयांना जादा चार्जेस न आकारता या योजनेतूनच रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक करावे.
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार बंधनकारक करून जास्तीत जास्त बिल आकारणीत मर्यादा ठेवावी. असे न केल्यास किंवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अवधूत भाट्ये यांनी केली.