corona virus -जिल्ह्यातील २० चेकपोस्ट नाक्यांवर प्रवाशांची ‘कोरोना’ तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:48 PM2020-03-21T14:48:28+5:302020-03-21T14:56:21+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
यावेळी महसूल, आरोग्य, ग्रामविकास व पोलीस यांच्या पथकाने वाहनांमध्ये जाऊन प्रवाशांना प्रबोधनपर माहिती दिली. किणी टोलनाका, कोगनोळी टोलनाका, गगनबावडा, राधानगरी, आंबा घाट, आदी प्रमुख नाक्यांवर ही तपासणी झाली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करावेत. तसेच या ठिकाणी महसूल, आरोग्य, ग्रामविकास व पोलीस पथकाच्या माध्यमातून वाहनांतील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोरोना आजाराविषयी प्रबोधनपर माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
शुक्रवारी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह तालुक्याच्या ठिकाणी २० चेकपोस्ट नाके स्थापन करून तपासणी सुरू करण्यात आली. यामध्ये पन्हाळा, भुदरगड व करवीर तालुक्यांना राज्य किंवा जिल्ह्याच्या सीमा लागत नसल्याने या ठिकाणी नाके स्थापन करण्यात आलेले नाहीत.
यामध्ये महसूल, आरोग्य व पोलीस यांच्या पथकांनी प्रथम अन्य जिल्ह्यांतून व अन्य राज्यांतून आलेल्या प्रवासी वाहनांना तपासणीसाठी थांबविले. त्यानंतर या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताप, खोकला व सर्दी, आदी कोरोना विषाणूसदृश लक्षणे आहे का, हे तपासण्यात आले. तसेच प्रवाशांचे कोरोनाविषयी समुपदेशन व प्रबोधन करण्यात आले. प्रवाशांची माहिती घेतलेला अहवाल संबंधित पथकाकडून तहसीलदारांकडे सादर केला जाणार आहे.
आंतरराज्य, आंतरजिल्हा तपासणी नाक्यांची नावे
तालुका तपासणी नाक्यांची ठिकाणे
- आजरा बहिरेवाडी, शिनोळी
- चंदगड दड्डी, कोवाड
- गडहिंग्लज हिटणी नाका, हलकर्णी, हेब्बाळ-जलद्याळ
- कागल लिंगनूर, कोगनोळी, मांगूर फाटा
- शिरोळ शिवनाकवाडी, पाच मैल फाटा, उदगाव
- हातकणंगले बोरगाव रोड, पंचगंगा पूल, शिवाजीनगर, कि णी टोलनाका
- शाहूवाडी आंबा, अणुस्कुरा
- गगनबावडा गगनबावडा
- राधानगरी दाजीपूर