corona virus : रुग्णालयापेक्षा घरीच उपचारास प्राधान्य, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:24 PM2020-10-19T17:24:16+5:302020-10-19T17:28:43+5:30
coronavirus, kolhapurnews गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा घरीच उपचार घेणे पसंत केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सीपीआरसह कोविड रुग्णालयात फक्त ७०१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर १४५१ रुग्ण घरीच अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
तानाजी पोवार
कोल्हापूर : गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा घरीच उपचार घेणे पसंत केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सीपीआरसह कोविड रुग्णालयात फक्त ७०१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर १४५१ रुग्ण घरीच अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
मार्चअखेरपासून १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता. नागरिकांत दहशत निर्माण झाली; पण गेल्या महिनाभरात कोरोनाचा प्रभाव ओसरतोय, तशी भीतीही कमी होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ४७ हजारांवर पोहोचली. उपचाराअंती सुमारे ४३ हजारांहून अधिक रुग्ण घरी परतले. सध्या जिल्ह्यात फक्त २१५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी ७०१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोल्हापूर शहरातील ५७६, नगरपालिका व ग्रामीण हद्दीतील ८७५ अशा एकूण १४५१ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच अलगीकरणात उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागात घरी अलगीकरणातील रुग्णांवर जिल्हा आरोग्य प्रशासन, तर कोल्हापूर शहरात घरी अलगीकरणातील रुग्णांवर महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टर नजर ठेवून उपचारांबाबत मार्गदर्शन करीत आहेत. याशिवाय शहरात मंगळवार पेठेतील अहिल्याबाई विद्यालयात शिक्षक वॉर रूममधून घरी अलगीकरणात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांची रोज विचारपूस करून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
कोविडच्या ४० रुग्णालयांत एकही रुग्ण नाही
कोरोनाचा प्रभाव मोठा होता, त्यावेळी जिल्ह्यातील सुमारे ९६ कोविड रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. अनेक रुग्णांना अक्षरश: बेड मिळाला नसल्याने अनेकांनी जीव सोडल्याची उदाहरणे समोर आहेत. पण सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता ही कोविडची ४० रुग्णालये ओस पडली आहेत. या रुग्णालयांत सध्या कोरोनाचा एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही.
सध्याचे रुग्णालयांतील रुग्ण
- सीपीआर रुग्णालय - ९०,
- आयजीएम रुग्णालय (इचलकरंजी)- २२
- डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय- ५०
- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाला; तर ८५ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७३७६ वर, तर मृत्युसंख्या १५९६ वर पोहोचली. दिवसभरात ३१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
-
गेल्या सहा महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने कहर उडविला होता. जिल्ह्यातील लोक अक्षरश: भीतीच्या छायेखाली वावरत होते, तर मृत्यूचेही प्रमाण कमालीचे वाढले होते; पण महिनाभरात कोरोनाचा प्रभाव टप्प्याटप्प्याने कमी होत आता पूर्णपणे उठाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा कहर कमी-कमी होत आता काही तालुक्यांत तर दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळत नाही.
गेल्या २४ तासांत अवघ्या ८५ नव्या रुग्णांची भर पडली; तर दोन व्यक्तींचा सीपीआरमध्ये मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या १५९६ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्या ४७३७५ च्या वर झाली आहे. आतापर्यंत सुमारे ४३६२८ जणांना डिस्चार्ज दिल्याने सद्य:स्थितीत सुमारे २१५२ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
भुदरगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एक नवा रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना गेल्या २४ तासांत भुदरगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एका नव्या रुग्णाची वाढ झाली; तर चंदगड तालुक्यात दोन, पन्हाळा तालुक्यात तीन, आजरा व शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी चार, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी सात; तर करवीर तालुक्यात आठ व कोल्हापूर शहरात नव्या ३५ रुग्णांची भर पडली.
दिवसभरात सीपीआर रुग्णालयात दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यांपैकी एक ६५ वर्षीय पुरुष करवीर तालुक्यातील आंबेवाडीतील; तर दुसरी ७८ वर्षीय महिला रुग्ण ही सातारा जिल्ह्यातील म्हारूळ हवेली (ता. पाटण) येथील आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णस्थिती...
आजरा- ८३५, भुदरगड- ११८४, चंदगड- ११४३, गडहिंग्लज- १३६०, गगनबावडा- १३४, हातकणंगले- ५१४६, कागल- १६१४, करवीर- ५४७५, पन्हाळा- १८१३, राधानगरी- १२०४, शाहूवाडी- १२६३, शिरोळ- २४२१, नगरपालिका- ७२६८, कोल्हापूर शहर- १४३४८, इतर जिल्हे / राज्य- २१६८.
- एकूण रुग्णसंख्या : ४७३७६
- एकूण मृत्यूसंख्या : १५९६