corona virus - खरेदीवर कोरोनाचे सावट, साखरेच्या माळा, चिव्याच्या काठीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:18 PM2020-03-24T13:18:55+5:302020-03-24T13:22:44+5:30
भारतीय पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी साखरेच्या माळा व चिव्याच्या काठीची खरेदी केली. मात्र यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट असणार आहे.
कोल्हापूर : भारतीय पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी साखरेच्या माळा व चिव्याच्या काठीची खरेदी केली. मात्र यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट असणार आहे.
हिंदू पंचांगानुसार चैत्राचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा हा सण उद्या, बुधवारी साजरा केला जात आहे. हा नवीन वर्षारंभ असल्याने घरांवर गुढी उभारली जाते. पुरणपोळीसह पक्वान्नांचा नैवेद्य केला जातो. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असल्याने या दिवशी खरेदी केल्यास कुटुंबात समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे.
मात्र, यंदा या सणाच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. शहरं लॉकडाऊन केली जात आहेत, नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जावू नये, असे आवाहन केले जात आहे. रविवारच्या बंदनंतर सोमवारी नागरिकांनी साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. या काळात गुढी उभारली जाते त्या चिव्याची काठी व साखरेच्या माळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.
चिव्याच्या काठीचा दर ५० रुपयांपासूनच १५० ते १८० रुपयांपर्यंत आहे. तर साखरेच्या माळा १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आकारमानानुसार आहेत. शहरातील लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, टिंबर मार्केट, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, महाद्वार रोड, खरी कॉर्नर यासह उपनगरांमध्ये चौकाचौकात चिव्याच्या काठ्या मांडण्यात आल्या आहेत.
सध्या सर्वत्र बंदचे वातावरण असल्याने साखरेच्या माळा विक्रेते ग्राहकांना गाडीसमोर अथवा दुकानासमोर गर्दी करू नका, असे आवाहन करीत आहेत. पटापट साहित्यांची विक्री करून माल संपवण्यावर त्यांचा भर आहे.
कोरोनाच्या धास्तीमुळे सध्या मुहूर्ताच्या खरेदीपूर्वी साहित्यांची केली जाणारी चौकशीही कमी झाली आहे. या दिवशी सोने, चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, होम अप्लायन्सेस, सायकली, दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली जाते. मात्र सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. सरकारकडून रोज नवनवे आदेश येत आहेत. त्यामुळे सणाच्या दिवसापर्यंत मुहूर्ताच्या उलाढालीचा नेमका अंदाज व्यावसायिकांनाही येत नाही.