Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:33 PM2020-09-10T19:33:14+5:302020-09-10T19:35:22+5:30
कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, शाहूपुरी, राजारामपुरी, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, आदी परिसर फुलला होता.
कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीसुद्धा काही ना काही कारण काढून अनेकजण दुचाकी अथवा चारचाकी घेऊन फिरत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे संसर्ग होऊ लागला आहे.
हा रोखण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजने पुढाकार घेत प्रथम व्यापारी, उद्योजकांच्यावतीने आज, शुक्रवारपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. या सहा दिवसांमध्ये कुटुंबाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, याकरीता गेल्या दोन दिवसांपासून अनेकजणांनी कडधान्ये, धान्य व कांदा बटाटा, भाजीपाला आणि नियमित लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक किराणा व घाऊक धान्य व्यापाऱ्यांकडे रांगा लावून खरेदीसाठी गर्दी केली होती.
विशेषत: कोरड्या वस्तूंना मागणी अधिक होती. अनेकांनी गहू घेण्याऐवजी तयार गव्हाच्या पिठाला प्राधान्य दिले. तर तांदूळ, जोंधळा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. विशेष म्हणजे मूग, मसूर, मटकी, चवळी ,काळा वाटाणा या कडधान्यांला मागणी अधिक होती. बाजारपेठेत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी खरेदीला गर्दी कमी होती.
शाहूपुरी परिसरातील पाचवी गल्लीसह शहरातील दुचाकी व चारचाकी मॅकेनिककडे आपली वाहने दुरूस्ती करून घेण्यासाठी इतर दिवसांच्या तुलनेत वाहनधारकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरात जत्रेचे स्वरुप आले होते. इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स दुकानेही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी अशा वस्तूंच्या खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.
जीवनावश्यक वस्तूंबरोबर फळांनाही मागणी वाढली
तापासह सर्दी, खोकला आदींमुळे अनेकांना अशक्तपणा आला आहे. त्यातून बरे होण्यासाठी जशी औषधांची गरज आहे. त्याप्रमाणेच फळांचीही आवश्यकता असते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, बाजारगेट आदी परिसरातील फळ विक्रेत्यांकडे लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली . विशेषत: सफरचंद, डाळिंब, संत्री, ड्रॅगन फ्रूट, किवी, पपई या फळांना अधिक मागणी होती.