corona virus - रक्षाविसर्जन विधी घेतला आटोपता: सोमवारी १९ रक्षाविसर्जन विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 06:00 PM2020-03-23T18:00:00+5:302020-03-23T18:01:38+5:30
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू झाली असल्याने सोमवारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाचा विधी आटोपता घेण्यात आला.
कोल्हापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू झाली असल्याने सोमवारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाचा विधी आटोपता घेण्यात आला.
मोजक्याच लोकांनी रक्षाविसर्जनाला येण्याचे महापालिकेने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी लवकर येऊन १० च्या आत सर्वांनी रक्षविसर्जनाचे विधी पूर्ण केला.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी जनता कर्फ्यू लागू केला होता तर राज्य शासनाने सोमवारपासून ‘कलम १४४’ लागू केले. त्यामुळे पाच लोकांवर एकत्र थांबता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर महापालिकेनेही अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जनाच्या विधीसाठी मोजक्याच लोकांनी यावे, असे आवाहन केले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांना तसे फोनवरून कळविलेही होते.
सोमवारी १९ रक्षाविसर्जन विधी
रविवारी कर्फ्यूमुळे अनेकांनी रक्षाविसर्जनाचा विधी करणे टाळले होते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवसांपासून अंत्यसंस्कार झालेल्यांचा रक्षाविसर्जनाचा विधी थांबला होता. त्यामुळे सोमवारी येथे मोठ्या संख्येने रक्षाविसर्जन असतानाही नेहमीपेक्षा कमी गर्दी पाहण्यास मिळाली. सकाळी १० पर्यंत १९ रक्षाविसर्जनाच्या विधी झाल्या.