corona virus : कोविड सेंटरमध्ये रंगला बारशाचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:28 PM2020-09-17T13:28:18+5:302020-09-17T13:29:37+5:30
पॉझिटिव्ह-निगेटिव्हची धाकधुक, आरोग्याची काळजी, कुटुंबीयांची चिंता असे एरवी कोविड सेंटरमधील चित्र असते. बुधवारी मात्र व्हाईट आर्मींच्या कोविड सेंटरमध्ये फुलांची सजावट होती, सगळीकडे उत्साह होता. पाळण्याची गाणी रंगली, व्हाईट आर्मीच्या तत्परतेमुळे कोरोनामुक्त झालेल्या या मातेच्या बाळाचे नाव ठेवले शुभ्रसेना आणि लाडाचे नाव शुभ्रा. बारशानंतर या मायलेकीला प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील घरी सुखरूप पोहोचवण्यात आले.
कोल्हापूर : पॉझिटिव्ह-निगेटिव्हची धाकधुक, आरोग्याची काळजी, कुटुंबीयांची चिंता असे एरवी कोविड सेंटरमधील चित्र असते. बुधवारी मात्र व्हाईट आर्मींच्या कोविड सेंटरमध्ये फुलांची सजावट होती, सगळीकडे उत्साह होता. पाळण्याची गाणी रंगली, व्हाईट आर्मीच्या तत्परतेमुळे कोरोनामुक्त झालेल्या या मातेच्या बाळाचे नाव ठेवले शुभ्रसेना आणि लाडाचे नाव शुभ्रा. बारशानंतर या मायलेकीला प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील घरी सुखरूप पोहोचवण्यात आले.
मुंबईला राहत असलेल्या अमृता सचिन गुरव या बाळंतपणासाठी मुंबईहून कोल्हापुरात प्रयाग चिखली येथे आल्या. ३ तारखेला त्यांना प्रसवकळा सुरू झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयाने उपचारास नकार दिला. अखेर एका सेवाभावी डॉक्टरांनी त्यांची प्रसूती केली.
रात्री एक वाजता गोड मुलगी जन्माला आली; पण आई पॉझिटिव्ह असल्याने त्याच दिवशी त्यांना व्हाईट आर्मीच्या दिगंबर जैन बोर्डिंग येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉ. आबाजी शिर्के व डॉ. अमोल कोडोलीकर यांनी केलेल्या १३ दिवसांच्या उपचारांनंतर त्या ठणठणीत बऱ्या झाल्या.
कोरोनामुक्त झालेल्या या मातेच्या बाळाचे नामकरण करूनच त्यांना निरोप देण्यात आला. बुधवारी दुपारी चार वाजता सेंटरमधून कोरोनामुक्त होऊन गेलेल्या महिलांच्या, कर्मचाऱ्यांच्या व नातेवाइकांच्या तसेच अशोक रोकडे यांच्या उपस्थितीत हा बारशाचा सोहळा रंगला. यानिमित्त परिसरात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. सेंटरला फुलांची सजावट करण्यात आली. गोडधोडाचे जेवण झाले. बारशासह कराओकेवर गाणी रंगली. यानंतर सायंकाळी मायलेकीला सुरक्षितपणे प्रयाग चिखली येथील घरी पोहोचविण्यात आले.