corona virus : लाल परीला गती; रेल्वे मात्र रुळांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 05:57 PM2020-09-02T17:57:30+5:302020-09-02T17:59:17+5:30
लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊननंतर एस. टी.ची लाल परी गती घेऊ लागली असून, दिवसाला कोल्हापूरच्या सर्व आगारांतून १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, आदी मार्गांवर धावू लागल्या आहेत. प्रवासी वर्गाचाही त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे.
एस.टी.च्या कोल्हापुरातील सर्व आगारांतून आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत आणि तालुका ते गाव या पातळीवर सुरू झालेल्या बसेसना पहिले काही दिवस अत्यल्प प्रतिसाद लाभला. मात्र, गणेशोत्सवाची धूम जशी सुरू झाली, तशी एस.टी. बसेसच्या चाकांनाही गती मिळू लागली.
५०, १०० आणि आता १२५ हून अधिक बसेस मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर या मार्गांवर गेल्या १० दिवसांहून अधिक काळ धावू लागल्या आहेत. या बसेसना प्रवासी वर्गातूनही उदंड़ प्रतिसाद लाभत आहे. वाढता प्रतिसाद पाहून कोल्हापूर आगारानेही मागणीप्रमाणे बसेसची सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे.
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसवरून अद्यापही पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पश्चिम रेल्वेने एकही रेल्वेची सोय केलेली नाही; त्यामुळे केवळ पुणे येथून गोवा एक्सप्रेस, पटना एक्सप्रेस, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आदी ठिकाणी जाण्यासाठी दिवाळीनंतरचे आरक्षण कोल्हापूर रेल्वे स्थानकातून केले जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यापासून नऊ लाख रुपयांचा परतावा कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून तिकीट रद्द केलेल्या प्रवाशांना देण्यात आला; तर बुधवारी दुपारपर्यंत १२ जणांनी २० प्रवाशांकरिता राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वे आरक्षण केले. त्यातून रेल्वेकडे १९ हजार ८७५ रुपये जमा झाले. हेही आरक्षण दिवाळीनंतरचे झाले आहे.
रेल्वेगाड्या सुरू झाल्यानंतरच रेल्वेला गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे अद्यापही रुळांवर थबकली आहे.
लॉकडाऊननंतर खासगी बसेसनाही प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातून रोज पुणे, मुंबई, सोलापूर या मार्गांवर हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत बसेस रवाना होत आहेत.