corona virus : रेमडेसीविर इंजेक्शन्स संपली, रुग्णांचे नातेवाईक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:32 PM2020-09-22T16:32:36+5:302020-09-22T16:34:40+5:30
कोरोनामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन्सची गेले आठ दिवस टंचाई भासत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
कोल्हापूर : कोरोनामुळे आजारी असणाऱ्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसीविर इंजेक्शन्सची गेले आठ दिवस टंचाई भासत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
जिल्हा परिषदेने कंपन्यांकडे ५ हजार इंजेक्शन्सची मागणी केली आहे. मात्र, अजूनही ही इंजेक्शन्स आलेली नाहीत. तसेच खासगी रुग्णालयांनीही मागणी केली असली तरी त्यांनाही पुरवठा झालेला नाही. आतापर्यंत प्रशासनाने १२ हजार इंजेक्शन्सवर ४ कोटी ७ लाख रुपये खर्च केले आहेत.
कोरोना रुग्णांसाठी ही इंजेक्शन्स उपयुक्त असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात या इंजेक्शन्सचे वितरण सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला जिल्हा परिषदेमार्फत ही वितरण व्यवस्था उभारण्यात आली.
या ठिकाणी नागरिकाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल, संबंधित रुग्णालयाचे पत्र आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकातील तीनपैकी एका डॉक्टरांचे शिफारसपत्र, आधारकार्डची झेरॉक्स दिल्यानंतर हे इंजेक्शन मोफत दिले जात होते. ३३०० रुपये एका इंजेक्शनची किंमत आहे.
मात्र ८ हजारांहून अधिक इंजेक्शन्स मोफत वाटल्यानंतर केवळ गोरगरीबच नव्हे, तर श्रीमंत लोकही येथूनच इंजेक्शन्स घेत असल्याचे दिसून आले. अनेक रुग्णालयांनीही गरजेपेक्षा अधिक इंजेक्शनची गरज असल्याचे लेखी दिल्याचेही लक्षात आले.
ही संख्या वाढतच निघाल्याने अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठीच ही इंजेक्शन्स मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील सरसकट वितरण थांबवण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून ही इंजेक्शन्स आलेलीच नाहीत. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्सकडून याची रोज मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींना फोन केले जात आहेत. मात्र, साठाच संपल्यामुळे अधिकारीही काही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दहा दिवसांपूर्वी आॅर्डर नोंदवूनही अजून इंजेक्शन्स उपलब्ध झालेली नाहीत. याच पद्धतीने खासगी रुग्णालयांनीही या इंजेक्शन्ससाठी त्यांच्या पातळीवर मागणी केली आहे, परंतु अजून त्यांनाही ती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
बीएमडब्ल्यू घेऊन इंजेक्शनसाठी
जेव्हा जिल्हा परिषदेच्या औषध भांडारातून सरसकट ही इंजेक्शन्स मोफत देणे सुरू होते. तेव्हा अनेक धनवान नागरिकांनी आपल्या नातेवाइकांसाठी या ठिकाणी धाव घेतली. बीएमडब्ल्यू गाडी घेऊन ही इंजेक्शन्स नेण्यासाठी नागरिक येथे रांगेत उभारल्याचे चित्र पहावयास मिळू लागले. अखेर हे सर्व चित्र पाहिल्यानंतर केवळ शासकीय रुग्णालयांसाठी ही इंजेक्शन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासगी रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्समधून या इंजेक्शन्सची मागणी वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुरवठा कमी पडत आहे. सर्वत्रच मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे, परंतु येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात ही इंजेक्शन्स येण्याची शक्यता आहे.
मदन पाटील,
संघटक सचिव, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन