Coronavirus Unlock : चार महिन्यांनी सलून सुरू, एस.टी. धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:06 PM2020-08-01T19:06:36+5:302020-08-01T19:07:10+5:30
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. शहरात दीड हजार आणि जिल्ह्यात पाच हजारांच्या आसपास सलून दुकाने आहेत. याशिवाय जिल्हाअंतर्गत एस. टी. बसेसची सुविधा सुरू झाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून सलून व्यवसाय बंद होता. जूनमध्ये १५ दिवस व्यवसाय करायला परवानगी दिली गेली. त्यानंतर मात्र पुन्हा शासनाने बंदी आदेश काढला; त्यामुळे जेमतेम काही दिवस सलून चालवून ते पुन्हा बंद करण्यात आले. शनिवारपासून मात्र अनलॉकअंतर्गत सलून व्यावसायिकांना सुरक्षेची सगळी काळजी घेत व्यवसायास परवानगी दिल्याने जिल्ह्यात पुन्हा सलून सुरू झाले.
सध्या मात्र जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू असून, शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनाही भीती असल्याने त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत व्यवसाय सुरू केला आहे. एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी सगळ्यांना वेळा दिल्या जात आहेत.
ग्राहक आत येताना त्यांना सॅनिटायझर देऊन, थर्मल गनद्वारे तपासणी, मास्क, फेस शिल्ड आणि पीपीई किट घालूनच ग्राहकांना सेवा दिली जात आहे.
गेले चार महिने नाभिक बांधवांनी अतिशय अडचणीत दिवस काढले आहेत. आज व्यवसाय सुरू झाला आहे, तरी नागरिकांमध्ये भीती असल्याने अपेक्षित प्रमाणात ग्राहक येत नाहीत. त्यांच्याप्रमाणे आम्हांलाही कुटुंबीयांची काळजी आहे. त्यामुळे आम्हीदेखील खबरदारी घेत आहोत.
- श्रीकांत झेंडे,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नाभिक दुकानमालक संघ
एस.टी.च्या मोजक्याच फेऱ्या
लॉकडाऊननंतर १० दिवसांनी एस.टी. बसेसच्या जिल्हाअंतर्गत फेऱ्या शनिवारपासून सुरू झाल्या. प्रत्येक तालुक्यात तीन ते चार बसेस सोडण्यात आल्या. शनिवार असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. आज रविवार आहे. उद्या, सोमवारी राखी पौर्णिमा असल्याने त्या दिवशी अधिक प्रवासी असण्याची शक्यता लक्षात घेऊन जादा बसेस सोडल्या जातील, अशी माहिती अधिकारी रोहन पलंगे यांनी दिली.