Coronavirus Unlock : शिवाजी पेठेतील दुकाने सुरु : चौकांमध्ये नागरीकांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 03:59 PM2020-09-11T15:59:44+5:302020-09-11T16:02:14+5:30
कोल्हापूर शहरात सर्वात प्रथम शिवाजी पेठेने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पेठेतील नागरीकांनी शुक्रवारी याला प्रतिसाद दिला नाही. काही दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरु होते. नागरीकही चौका चौकात उभे होते.
कोल्हापूर : शहरात सर्वात प्रथम शिवाजी पेठेने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पेठेतील नागरीकांनी शुक्रवारी याला प्रतिसाद दिला नाही. काही दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरु होते. नागरीकही चौका चौकात उभे होते.
शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन पेठेत फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, ते गेल्यानंतर पुन्हा दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला नाही, असे म्हणावे लागेल.
शिवाजी पेठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून ५०० पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. यामध्ये काहींचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेठेतील मंडळांची शिखर संस्था असणाय्रा शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे शिवाजी पेठेत जनता कर्फ्यू केला पाहिजे, असा निर्णय झाला. या निर्णयानंतर महापौर निलोफर आजरेकर यांनी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ११ ते २१ सप्टेंबर रोजीच्या जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
त्यांच्या आवाहनानुसार शिवाजी पेठ शुक्रवारी जनता कर्फ्यूत सहभागी होणार होती. प्रत्यक्षात मात्र, शिवाजी तरुण मंडळाच्या आवाहनाला पेठेतील नागरीक, व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला नाही. काही व्यावसायिकांनी अर्धे शेटर उघडून दुकाने सुरु ठेवली. ताटाकडील तालीम मंडळ चौक ते साकोली कॉर्नर मार्गवरील काही दुकाने बंद होती.