corona virus : राज्य सरकारचे पथक कोल्हापुरात येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:29 PM2020-08-11T16:29:48+5:302020-08-11T16:32:55+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून साततत्याने चढत्या क्रमाने कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून साततत्याने चढत्या क्रमाने कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढील काळात साथ रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्याकरिता काय करायला पाहिजे याची माहिती घेण्याच्या अनुषंगाने तसेच येथील आरोग्य यंत्रणेला मदत करण्याकरिता राज्य सरकारचे एक पथक लवकरच कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे.
रविवारी कराड येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील मंत्री, आमदार खासदार, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक झाली.
या बैठकीत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांची साखळी तुटत नसून ती अधिकाधिक घट्ट होत चालल्याची कबुलीच दिली. जिल्हा व आरोग्य प्रशासन चांगले प्रयत्न करत असले तरी वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यावर बऱ्याच मर्यादा येत आहेत. एक प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची कल्पनाच बैठकीत करुन देण्यात आली.
दोन जिल्ह्यात प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न अपूरे असल्याचे मंत्री टोपे व पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुढील काळात कोरोनाची ही साखळी तोडायची असेल तर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवून देऊन काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती घेतली जाणार आहे. लवकरच असे एक पथक कोल्हापूरला येईल, असे सांगण्यात आले.
कोल्हापूर पेक्षा मुंबईत जास्त परिस्थिती गंभीर आहे. तेथे कशा प्रकारे कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. जंबो कोविड सेंटर्स उभारली आहेत. रुग्णांवर उपचार कशा प्रकारे केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण कसे दिले जात आहे. याची सगळी माहिती कोल्हापूर व सातारा आरोग्य प्रशासनाला सुध्दा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणूनच असे एक पथक लवकरच पाठविले जाणार असल्याचे कराडच्या बैठकीत स्पष्ट झाले.