corona virus : कंटेन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट करा :आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:12 PM2020-08-17T12:12:07+5:302020-08-17T12:13:25+5:30
कंटेन्मेंट झोनमध्ये कडक अमंलबजावणी करा. विशेष मोहिमेदरम्यान गरज भासल्यास येथील लोकांची अँटिजेन टेस्ट करा. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
कोल्हापूर : कंटेन्मेंट झोनमध्ये कडक अमंलबजावणी करा. विशेष मोहिमेदरम्यान गरज भासल्यास येथील लोकांची अँटिजेन टेस्ट करा. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव यांची निवडणूक कार्यालय येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी आढावा बैठक घेतली.
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, दैनंदिन सर्व्हे करताना रुग्ण आयडेंटिफाय झाले पाहिजेत. कंटेन्मेंट झोनमध्ये नोडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सचिव या सर्वांनी मिळून एकत्रित काम करा. सर्वांनी कंटेन्मेंट झोनमधील १०० टक्के माहिती गोळा करा.
सदस्य, कार्यकर्ते, शिक्षक व स्थानिक लोकांची मदत घ्या. कर्मचारी व आशा वर्कर्स यांची काळजी घेण्यासाठी त्यांना पीपीई किट द्या. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा. प्रत्येक प्रभागामध्ये स्राव घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असणारी माहिती प्रभाग समितीला दैनंदिन कळवा. शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे. कोणाचाही मृत्यू होता कामा नये.