corona virus : आणखी दोन ऑक्सिजन टाक्या बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:45 PM2020-09-12T12:45:34+5:302020-09-12T12:46:38+5:30
अतिग्रे येथील संजय घोडावत जिल्हा कोविड सेंटर तसेच कोल्हापूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येक सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या बसविण्यात येणार आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड सेंटर्समधून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असून हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत जिल्हा कोविड सेंटर तसेच कोल्हापूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येक सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टाक्या बसविण्यात येणार आहेत. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून त्यांच्यावरील उपचाराकरिता ऑक्सिजनची मोठी आवश्यकता भासत आहे. सीपीआर रुग्णालयात गेल्या महिन्यात वीस हजार लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली. त्याठिकाणी आता एकावेळी ४५० रुग्णांना ऑक्सिजन देण्याची सोय झाली. त्याच धर्तीवर जिल्ह्यात प्रत्येकी सहा हजार किलोलिटर क्षमतेच्या आणखी दोन टाक्या बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
त्यातील एक टाकी ही कोल्हापूर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्क येथील कोविड सेंटरमध्ये, तर दुसरी टाकी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत, जिल्हा कोविड सेंटर येथे बसविण्यात येणार आहे. या प्रत्येक टाकीचा अंदाजे खर्च २७ लाख ८७ हजार रुपये इतका आहे.
सीपीआर रुग्णालयाच्या आवारात बसविण्यात आलेली ऑक्सिजन टाकी ही चेन्नई येथून आणण्यात आली आहे. त्याच धर्तीवर टाक्या तयार करणारे कारखाने कोल्हापूर व आसपासच्या परिसरात आहेत. त्यामुळे टाकीसाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर ही निविदा स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा प्रशासनाने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले आहे.