corona virus -डिजीटल बँकिंगचा वापर करा, बँकांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:55 PM2020-03-23T17:55:12+5:302020-03-23T17:57:05+5:30
बँकेत न येता मोबाईल, ई बँकिंग, आॅनलाईन बँकिंग अशा डिजीटल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन शहरातील सर्व बँकांनी केले आहे.
कोल्हापूर : बँकेत न येता मोबाईल, ई बँकिंग, आॅनलाईन बँकिंग अशा डिजीटल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन शहरातील सर्व बँकांनी केले आहे.
सोमवार असल्यामुळे काही बँकांमध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याचे आढळले. त्यानंतर प्रशासनकडून हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र थांबण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
केवळ ‘अत्यावश्यक सुविधा’ सुरू असून यामध्ये बँका, हॉस्पिटल, जनरल स्टोअर्स यांचा समावेश आहे. मार्चअखेर असल्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकांमध्ये ग्राहक येत आहेत. शनिवार आणि रविवारी साप्तहिक सुटी असल्यामुळे सोमवारी कार्यालयामध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू होती.
विमा कंपनीच्या सेंटर बाहेर रांगा
मार्चअखेरीस विम्याचा हप्ता जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा दंड अथवा पॉलिसी खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर येथील एका विमा कंपनीच्या सेंटरमध्ये सोमवारी हप्ता भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. कंपनीने दक्षता म्हणून कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लावल्या. ठरविकांनाच कार्यालयात प्रवेश दिला जात होता. हप्ता भरून ते बाहेर आल्यानंतर पुढील ग्राहकांना आत सोडले जात होते.
सॅनिटायझर लावून आत प्रवेश
बँकांमध्ये ग्राहकांना सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे तसेच कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहेत. दोन दिवसांनंतर बँक सुरू झाल्यामुळे सोमवारी काही बँकांमध्ये ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी तसेच जमा करण्यासाठी गर्दी केली होती.